माता-बालस्नेही पहिल्या प्रकल्पाचा गुहागरात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:35 AM2021-09-23T04:35:47+5:302021-09-23T04:35:47+5:30
गुहागर : राज्यातील पहिल्या माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्पाचा शुभारंभ गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वी ...
गुहागर : राज्यातील पहिल्या माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्पाचा शुभारंभ गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गावातीलच आशा, अंगणवाडीसेविका आणि तरुण मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेतल्या कमतरता दूर करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून चालणार नाही, तर लोकसहभागातून गावागावातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे. जेणेकरून अधिक उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाऊ लागू नये. विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी संपर्क संस्थेने माता-बालस्नेही हा प्रकल्प हाती घेतला आहे.
संपर्क, युनिसेफ, प्रथम शैक्षणिक फाउंडेशन यांच्यातर्फे माता-बालस्नेही प्रकल्पांतर्गत तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती. याचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, माजी सभापती विभावरी मुळे, महिला बालविकास अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन विनायक मुळ्ये व वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज देशमुख, संपर्क संस्थेची प्रतिनिधी जान्हवी पाटील यांनी केले होते.
----------------
प्रकल्पासाठी लोकसहभाग
गावातील लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी केला जाणार आहे. माता-बालस्नेही आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर त्वरित डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय गरोदर मातांचे समुदेशन, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल, आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळतेय का, यासाठी एक पथक या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहे.