अनाथांची माय, सिंधुताईचा कष्टप्रद प्रवास देखाव्यात उमटला, रत्नागिरीतील मयूर भितळे यांचा दीड महिन्यापासून प्रयत्न
By शोभना कांबळे | Published: September 23, 2023 07:10 PM2023-09-23T19:10:45+5:302023-09-23T19:12:05+5:30
चलचित्र देखावा परिसरात ठरतोय आकर्षण
रत्नागिरी : कोकणचे लाडके दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे सध्या या उत्सवाचे औचित्य साधून काही ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी संदेश दिले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने अनाथांची माय झालेल्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाच्या प्रवासातील चार कष्टप्रद प्रसंगावर आधारित चलचित्र देखावा साकार केला आहे.
सिंधुताई सकपाळ यांनी अगदी लहान वयापासून कष्ट उपसले. लहान वयात विवाह झाला, पण सुखाऐवजी नशिबात दु:खच आले. चारित्र्यावर संशय घेऊन दिवस गेलेले असतानाच जोडीदाराने मारहाण करून घराबाहेर काढले. डोक्यावरचे छतच गेल्याने एका गोठ्यात मुलाला जन्म दिला. स्मशानभूमीत जळत असलेल्या चितेच्या उजेडात रात्र घालवली आणि पोटातील भुकेची आग शमविण्यासाठी त्या अग्नीवर पिठाचा गोळा ठेवून भाकरी भाजली. आपल्या मुलीच्या आयुष्यात आपल्यासारखे कष्ट नको यायला, म्हणून एका सहृदयी कुटुंबाकडे तिला सुपूर्द करून त्या महाराष्ट्रातील अनाथ मुलांची माय झाल्या.
त्यांच्या या प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी केला आहे. सिंधुताईच्या कष्टप्रद जीवनाला केंद्रीय स्थानी ठेवून भितळे यांनी केलेला हा चलचित्र देखावा पाहताना त्यांच्या जीवनाचे चित्र समोर उभे राहाते. हा देखावा २८ सप्टेंबर, अनंत चतुर्थीपर्यंत पाहण्यासाठी खुला राहाणार आहे.
दीड महिन्यापासून प्रयत्न
मयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली पाच वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी देखावे केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी दीड महिन्याच्या प्रयत्नातून यंदा पहिल्यांदाच केला. यासाठी त्यांना साैरभ मयेकर, स्वाती सोनार, साहिल मयेकर, अभिजीत आलीम आणि ध्वनी संकलानासाठी संदीप पावसाकर, शुभम शिवलकर यांचे सहकार्य मिळाले.