खेळाडूंची प्रेरक ताई - सरनोबत राही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:51+5:302021-07-05T04:19:51+5:30
तसे पाहिले तर प्राचीन काळापासून खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. खेळाने लहान मुलांचा विकास चांगल्याप्रकारे ...
तसे पाहिले तर प्राचीन काळापासून खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. खेळाने लहान मुलांचा विकास चांगल्याप्रकारे होतो. त्यांच्यातील आंतरिक कौशल्याचा विकास होतो. त्यांच्या सर्वप्रकारच्या कौशल्यांच्या विकासामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहते व मुलांची वाढ झपाट्याने होते. खेळांमुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना वाढते. मुले आणखी चांगली सामाजिक होतात, एकमेकांसोबत आपले सामंजस्य स्थापित करतात. खेळांमुळे निर्णय क्षमता विकसित होते. लहान मुलांपुढे राही सरनोबत हिचा आदर्श एक मोठी ताई म्हणून नेहमी राहील. लहान मुलांप्रमाणे प्रत्येक खेळाडूपुढेही आदर्श म्हणून राहीचे प्रेरक व्यक्तिमत्व राहील.
राही सरनोबत या खेळाडूनेसुद्धा आपल्यासमोर तेजस्विनी सावंत या खेळाडूचा आदर्श ठेवला होता. तेजस्विनी सावंत ही खेळाडू ५० मीटर रायफल प्रोन प्रकारातील विश्वविजेती नेमबाज आहे. आपण एक पालक म्हणून आपल्या पाल्यांना खेळांविषयी जागृत करून त्यांच्यात त्याप्रति ऋची निर्माण करणे जरूरीचे आहे. भारतासारख्या बलाढ्य देशाला जास्तीत जास्त सुवर्णपदके प्राप्त करून देण्यासाठी चांगले खेळाडू तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये लहानपणापासून खेळांविषयी आवड व उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या मुलांवर खेळाडूंचे चांगले संस्कार करणे हे महत्त्वाचे आहे.
राही सरनोबत हिने यापूर्वीही अनेक पदके मिळवली आहेत. तिने २००८मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. विविध स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट करणाऱ्या राहीची २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठीही निवड झाली होती. या सर्व खेळातील तिच्या योगदानासाठी भारत सरकारने २०१८ साली तिला ‘अर्जुन पुरस्कार’ने सन्मानित केले आहे. राहीसारख्या मोठ्या ताईने मिळवलेले हे यश लहान व नवोदित खेळाडूंसाठी प्रेरकच आहे.
- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर