गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

By अरुण आडिवरेकर | Published: August 25, 2022 05:20 PM2022-08-25T17:20:04+5:302022-08-25T17:20:59+5:30

महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार

Motorists coming to Ratnagiri for Ganeshotsav face the problem of potholes | गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

googlenewsNext

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : गेली दाेन वर्ष काेराेनाच्या भीतीमुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांच्या मनात भीती हाेती. अनेकजण जीव मुठीत घेऊनच गावी आले हाेते. यावर्षी काेराेनाचे प्रमाण कमी, त्यातच काेणतेही निर्बंध नसल्याने मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार आहे.

यावर्षी काेराेनाची रुग्णसंख्या कमी आहे. त्यातच शासनाने उत्सवावरील निर्बंध उठविल्याने गणेशाेत्सव दणक्यात साजरा हाेणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार आहेत. मात्र, गावी येताना मुंबईकरांना महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. वेळेत घरी पाेहाेचण्यासाठी लवकरच निघावे लागणार आहे.

कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अर्धवट स्थितीत

जिल्ह्याची सीमा सुरु हाेणाऱ्या कशेडी घाटातील भुयारी बाेगद्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. दाेनपैकी एकच बाेगदा पूर्ण खाेदून झाला आहे. मात्र, अंतर्गत काम अजूनही झालेली नाही. या भागात खड्डे पडल्याने जिल्ह्याच्या हद्दीतच खड्ड्यांनी स्वागत हाेणार आहे. तालुक्यात ४४ किलाेमीटरच्या भागात ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, असगणी फाटा येथील ओव्हर ब्रीजचे काम अर्धवट आहे.

परशुराम घाटात काम रखडलेले

चिपळूण तालुक्यात कापसाळ, कामथे, वालाेपे, परशुराम घाट आणि सावर्डे या भागात खड्ड्यांमुळे जीव मेटाकुटीला येताे. शहरातील पाॅवर हाऊस, बहाद्दूरशेख नाका, परशीतिठा हा भागही खड्डेमय झाला आहे. कामथे, परशुराम घाटात काम रखडलेले आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या ४५ पैकी केवळ १३ पिलरचे काम झाले आहे. उर्वरीत काम अर्धवटच आहे. दाेन किलाेमीटरचा सर्व्हीस राेडही खड्डेमय आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तीन पुलांची कामे रखडलेली

संगमेश्वर तालुक्यातील धामणी, तुरळ, कुरधुंडा, वांद्री, आरवली या भागात खड्डेच खड्डे आहेत. या मार्गावरील माेऱ्यांवर डांबरीकरण न झाल्याने वाहन चालविणे मुश्किल झाले आहे. साेनवी पुलाचे तीन पिलर अर्धवट स्थितीत आहेत. शास्त्रीनदीवरील पुलाचा जाेडरस्ता झालेला नाही तर मानसकाेंड येथील पूल रखडलेलाच आहे.

राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्ण

लांजा तालुक्यातील देवधेपासून वाकेडपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना सांभाळूनच यावे लागणार आहे. शहरात नळपाणी याेजनेमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. राजापूर तालुक्यात मात्र, बहुतांशी काम पूर्ण झाले असून, एसटी बस स्थानक, काेदवलीत ५०० मीटर आणि हातिवलेतील ५०० मीटरचा भाग वगळता काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील प्रवासात खड्ड्यांचा त्रास कमी हाेणार आहे.

Web Title: Motorists coming to Ratnagiri for Ganeshotsav face the problem of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.