रत्नागिरी जिल्ह्याच्या परिपूर्ण विकास आराखड्यासाठी सामंजस्य करार
By शोभना कांबळे | Published: October 2, 2023 04:41 PM2023-10-02T16:41:46+5:302023-10-02T16:42:13+5:30
रत्नागिरी : जिल्ह्याचा विकास आराखडा परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ...
रत्नागिरी : जिल्ह्याचा विकास आराखडा परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संस्थेची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मान्यतेने व शासन निर्देशानुसार मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कर्णे व जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्यामध्ये सामंजस्य कराराबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
आराखडा तयार करण्याकामी जिल्ह्यातील विविध विभागांकडून सामर्थ्य, कमकुवतपणा, संधी, धोके, कृती योजना, दृष्टी, ध्येय याबाबत माहिती संकलनाची युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. सन २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत मुख्य सचिवांच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. हा विकास आराखडा तयार करताना विविध शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी आवश्यक त्या कार्यप्रणालीचा या आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे.
जिल्हा विकास आराखडा तयार करताना विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करावयाची आहे. तसेच आजचे सकल जिल्हा उत्पन्न व त्यामध्ये पुढील पाच, दहा, पंधरा वर्षांच्या कालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावरही लक्ष्य केंद्रित करावयाचे आहे. कृती कार्यक्रमाचे वर्गीकरण कमी/मध्यम/दीर्घ मुदतीच्या बाबी याप्रमाणे करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अथवा जिल्ह्यास गुंतवणुकीचे केंद्र म्हणून ओळख देऊ शकणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील क्षेत्रांची बलस्थाने ओळखून विविध योजना कार्यक्रम/ अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.