खाडीपट्ट्यात डोंगरतोड
By admin | Published: July 18, 2014 11:09 PM2014-07-18T23:09:24+5:302014-07-18T23:13:46+5:30
जबाबदार कोण : मिळेल त्या किमतीत खरेदी
खाडीपट्टा : गेल्या काही वर्षांपासून खेड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डोंगरांची कत्तल सुरु आहे. बेकायदा चाललेल्या या उत्खननाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पैशांच्या लालसेपोटी ठेकेदार व जमीनमालक नियम धाब्यावर बसवून हे उत्खनन करीत असल्याचे पुढे आले आहे.
बेसुमार होत असलेल्या या उत्खननामुळे खाडीपट्ट्यातील खेड - पन्हाळजे मार्गावर दरडी व दगड कोसळण्याची शक्यता आहे. हा मार्ग अशा प्रकारामुळे बंद होण्याची शक्यता ग्रामीण भागातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्र फोफावले असून, ग्रामीण भागातून शहरीकरणावर त्याचा परिणाम झाला आहे. शहर परिसरात गुंठ्याला प्रचंड भाव येत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामीण भागातील डोंगरावर असलेल्या जागा घशात घातल्या आहेत. काही ठिकाणी यावर मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.
बहुतेक डोंगरातील जागा या मालकीच्या असल्याने संबंधितांना आमिषे दाखवून डोंगरातील जमिनी काबीज करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खेड खाडीपट्ट्यात गेल्या दोन वर्षांपासून सुसेरी, नांदगाव, मुंबके, राजवेल, कर्जी, आमशेत, कुंभाड, खोडखाड, सवणस, बहिरवली व पन्हाळजे आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात डोंगरांची कत्तल सुरु आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात दगड कोसळून झालेल्या अपघातास जबाबदार कोणाला धरावे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
खाडीपट्टा भागात डोंगरतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महसूल यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, असे प्रकार रोखणार कोण हा प्रश्न आहे. (वार्ताहर)