कोयना धरण क्षेत्रातील डोंगर खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:08+5:302021-08-19T04:34:08+5:30
शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या ...
शिरगाव : कोयनानगर नवजानजीक मोठा डोंगराळ भूभाग खचल्याने संपूर्ण शिवसागर गढूळ झाला आहे. तेथूनच पोफळी व कोळकेवाडी येथे होणाऱ्या वीज निर्मितीचे इंटेक टनेल असल्याने वीज निर्मितीला येणारे पाणी गढूळ आले. शिवाय चौथ्या टप्प्यातून वीज निर्मितीचे पाणी ज्या बोगद्यातून बाहेर पडते त्याठिकाणी कोळकेवाडी येथेही तसाच डोंगर खचल्याची दुसरी घटना घडली. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांतून गढूळ पाणी पुरवठा होत आहे.
चिपळूणला २१ व २२ जुलै रोजी महापूर आला, त्याचदिवशी कोयनानगर व कोळकेवाडी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोफळी अलोरे, नागावे, कोळकेवाडी, पेंढाबे या गावांमध्ये २४ जुलैपासून गढूळ पाणी येत आहे. या घटनेमुळे पाण्याचे पारंपरिक स्रोत आणि पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. पोसरे येथील स्थलांतरित २८ कुटुंब ही अलोरेत शासकीय वसाहतीत राहात आहेत. त्यांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करतानाच जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांनी जिल्हा परिषदेचा टँकर अलोरे गावासाठी उपलब्ध केला आहे. नागावे सरपंच प्रकाश चिपळूणकर यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी गावातील बोअर दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना सुरू केली आहे. ग्रामपंचायत निधीतून रक्कम खर्च करून ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. केवळ पावसाळा असल्याने पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाण्याची प्रासंगिक व्यवस्था करण्यात येत आहे.
याच पद्धतीने चिपळूण शहर, खेर्डी व कळंबस्ते येथील पाणी योजनांनाही अजून गढूळ पाणी येत आहे. शहरातील पाणी योजनेंतर्गत वाशिष्ठी नदीवर खेर्डी व गोवळकोट येथे जॅकवेल असून, तेथून पाणी उचलले जाते. मात्र महापूर ओसरल्यानंतरही शहरातील नागरिकांनाही गढूळ पाणी मिळत असल्याने याविषयी आता नागरिकांमधून ओरड सुरू झाली आहे.