नोटांसाठी पळापळ; जनतेचे हाल
By admin | Published: November 13, 2016 11:28 PM2016-11-13T23:28:44+5:302016-11-13T23:28:44+5:30
गोंधळ कायम : नवीन, जुन्या चलनाच्या टंचाईने बॅँकाही हतबल, बॅँक ग्राहक घामाघूम
रत्नागिरी : मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे रद्द केल्याने निर्माण झालेला गोंधळ संपलेला नाही. सामान्य माणसांनाच या निर्णयाची सर्वाधिक झळ बसली आहे. निर्णयानंतरच्या पाचव्या दिवशीही (रविवार) ‘नोटांसाठी पळापळ संपेना’, अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हा गोंधळ संपणार कधी, असा संतप्त सवालही नागरिकांतून केला जात आहे.
पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर जनतेच्या सोयीसाठी रविवारीही बॅँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने निर्णयानंतरच्या पाचव्या दिवशीही सर्वच बॅँकांसमोर जुन्या नोटा खात्यात भरण्यासाठी व चलनातील शंभर रुपयांपर्यंतच्या तसेच नवीन २ हजारच्या नोटा काढण्यासाठी बॅँक ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. एटीएमकडे धाव घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, तेथे काही वेळातच नोटा संपल्याचा ‘घंटानाद’ झाला की पुन्हा दुसऱ्या एटीएमकडे धावायचे, पुन्हा रांगेत उभे राहायचे, या चक्रातच अनेकांचा रविवार वाया गेल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
हातातील कामे बाजूला टाकून गेल्या चार दिवसांपासून अनेकांनी बॅँकांसमोर पैशांसाठी रांगा लावल्या. त्यामुळे त्यांचा रोजगारही बुडाला आहे. शासनाच्या आदेशानुसार बॅँकांचे कामकाज रविवारी सुरू ठेवण्यात आले. यापुढेही शासनाचा आदेश आल्यास बॅँका अधिक वेळही सुरू राहतील. परंतु लोकांना देण्यासाठी पुरेसे पैसेच उपलब्ध होत नसल्याने बॅँकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
अर्थव्यवस्थेत असलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे व हजारच्या नोटा अचानकपणे बंद करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सुरूवातीला जनतेतून स्वागत करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर गेल्या पाच दिवसात सामान्य माणसांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी जी काही कसरत करावी लागली, त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. निर्णय चांगला असला तरी सामान्य जनतेच्या हालअपेष्टांचे काय, असा सवाल आता खुलेआम केला जात आहे. सामान्य जनतेला या निर्णयाचा त्रास होऊ नये, यासाठी नवीन नोटांचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने का केले गेले नाही, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. सुरुवातीला पहिल्या दोन तीन दिवसात सारे काही सुरळीत होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, स्थिती गोंधळाची असून, ती लवकर पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी येत्या तीन आठवड्यात स्थिती सुधारेल, असे वक्तव्य करून गोंधळात आणखीच भर टाकली आहे. किती दिवसात स्थिती पूर्वपदावर येईल, याबाबत सरकारचे मंत्रीच वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याने विश्वास कोणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरात नोटांच्या उपलब्धतेबाबत हीच स्थिती असून, सामान्य लोकांना चांगले दिवस कधी येणार, असा सवालही केला जात आहे. या रांगांमध्ये सामान्य लोकच दिसून येत असून, काळा पैसेवाले कुठे आहेत, असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)
लग्नांचा सुकाळ अन पैशांचा दुष्काळ?
तुलसी विवाहानंतर लगेचच लग्नमूहूर्त असल्याने लग्नांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तयारीही सुरू होती. येत्या आठवडाभरात जिल्ह्यात शेकडो शुभमंगल होणार आहेत. त्यासाठी अनेकांनी याआधीच बॅँकांमधून पैसे काढून ठेवले होते. कर्ज काढून व मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्याने व नवीन नोटाही उपलब्ध नसल्याने या शुभमंगल कार्यात विघ्न उभे राहिले आहे. नवीन चलन बॅँकांमधून उपलब्ध होण्यास अजून महिनाभराचा कालावधी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्न समारंभातील हे आर्थिक विघ्न कसे दूर करावे, ही चिंता वधू-वरांच्या कुटुंबियांना सतावते आहे.