शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन
By अरुण आडिवरेकर | Published: October 20, 2022 06:33 PM2022-10-20T18:33:41+5:302022-10-20T18:34:11+5:30
कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील.
रत्नागिरी : शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एक जरी विद्यार्थी शाळेत शिकत असेल तरी ती शाळा बंद करू नये, या मागणीसाठी गाव विकास समितीने आज, गुरुवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. गाव समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात शाळा आहेत. यातील अनेक शाळांचा पट हा ० ते २० च्या मध्ये आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील. त्यामुळे गाव खेड्यातील, दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, असे गाव विकास समितीने जिल्हाधिकारी यांना आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कमी पटसंख्या असली तरी दुर्गम भागातील शाळा बंद होऊ नयेत अशी आमची भूमिका असून, हीच भूमिका येथील विद्यार्थी व पालकांची आहे, असे गाव विकास समितीने म्हटले आहे.
यावेळी सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी, रत्नागिरी जिल्हा संघटक मनोज घुग, तालुका संघटक सुकांत पाडाळकर, संगमेश्वर तालुका संघटक प्रशांत घुग, ग्रामीण विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष दैवत पवार, सदस्य नितीन गोताड, महेंद्र घुग, शुभम गोरुले उपस्थित होते.