‘त्या’ कपंनीविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन
By admin | Published: December 1, 2014 10:45 PM2014-12-01T22:45:10+5:302014-12-02T00:24:50+5:30
तणावपूर्ण वातावरण : अतिक्रमण केले जात असल्याच्या जमीनदारांच्या तक्रारी
सातार्डा : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीने नियोजित केलेल्या रस्त्याच्या कामासाठी सुरुवात केली असून, रस्त्याचे काम करताना अतिक्रमण केले जात असल्याच्या तक्रारी जमीनदारांनी केल्या आहेत. तरीही जमीनदारांवर दबाव आणण्यासाठी शनिवारी चार पोलीस व्हॅनसह कामाच्या ठिकाणी पोहोचल्याने सातार्डा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उत्तम स्टीलकडून पोलीस बळाचा वापर करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करून कंपनीच्या मनमानीविरोधात आंदालन छेडण्याचा इशारा जमीनदारांनी दिला आहे.
सातार्डा - सातोसे पर्यायी नव्या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेने शर्थी व अटी घालून परवानगी दिली असताना कंपनीने पालन केले नाही. रस्त्याची कायदेशीर मोजणी करून जमिनीतून रस्ता द्यावयाचा असताना जमीनमालकांना विश्वासात न घेता हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असताना कंपनी पोलिसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप जमीनमालक फटू सोनू राऊळ, चंद्रकांत टेमकर, सद्गुरू हरमलकर तसेच मनोहर मेस्त्री यांनी केला असून, याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कपंनीने सातार्डा-सातोसे रस्त्याच्या १२ मीटर रुंदीकरणासाठी नीस न लावल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण करून उत्खनन केल्यामुळे जमिनीचे नुकसान होत आहे. कंपनीने पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये यांनी पोलिसांना सातार्डा गावामध्ये पोलीस व्हॅन आणण्याचे प्रयोजन विचारले असता पोलीस निरीक्षक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे सरपंच पारिपत्ये यांच्यासह माजी उपसरपंच संदीप प्रभू, जयकुमार पारिपत्ये, नामदेव गोवेकर, बंड्या काले, चंद्रकांत मेस्त्री, मनोहर मेस्त्री यांनी पोलिसांना जाब विचारला. जिल्हा परिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थींच्या अधीन राहून कंपनीने रस्त्याच्या जमिनीचा कायदेशीर सर्वे करून, शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करूनच कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)