एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात, परीक्षांच्या तारखांचा लागला घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:37+5:302021-07-07T04:39:37+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षाच घेण्यात ...
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षाच घेण्यात आलेल्या नाहीत. शासकीय वर्ग १ व २ पदासाठी तयारी करणारे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असले तरी परीक्षेला विलंब होत असल्याने चिंताग्रस्त झाले आहेत.
कोरोनामुळे गेले दीड वर्षे स्पर्धा परीक्षा न घेता, तारखा जाहीर करण्यात आल्या. अभ्यासासाठी मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन सुरू आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या भासत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाचा फायदा होत नाही. शिक्षणात सातत्य राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन वेळेवर होत नाही. एकतर्फी शिक्षण शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
स्पर्धा परीक्षांच्या वेळोवेळी तारखा बदलण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय मात्र वाढत आहे. शासकीय अधिकारी पदाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा होत नसल्याने वाढत्या वयामुळे चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे मुलांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गरीब, होतकरू विद्यार्थी बेताच्या परिस्थितीमुळे तसेच वाढत्या खर्चामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने स्पर्धा परीक्षांच्या तारखा घोषित करून ऑफलाईन वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी होत आहे.
तारखा केव्हा जाहीर होणार
- पीएसआय, एसटीआय असिस्टंट, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक
- कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक
- सरळसेवा भरतीअंतर्गत महिला व बालविकास विभागातील समाजकल्याण निरीक्षक
- पोलीस भरती, परिवहन अधिकारी
शासकीय नोकरी मिळविण्याच्या ओढ्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. मर्यादित पदांसाठी हजारो विद्यार्थी परीक्षा देत असतात. काही नैराश्यामुळे ग्रासले जातात. वास्तविक संविधानिक आयोग असताना स्पर्धा परीक्षेत राजकारण आणलं जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा, मुलाखती वेळेवर व्हाव्यात.
- प्रा. इंदुमती मलुष्टे
स्पर्धा परीक्षांना जेवढा विलंब होईल तेवढाच मुलांमधील आत्मविश्वासही कमी होण्याचा धोका आहे. स्पर्धा परीक्षा आयोगावरील विश्वास कमी झाला तर मुलांमध्ये नैराश्य निर्माण होईल. वास्तविक शासकीय नोकरीत अनेक पदे रिक्त असून सरळ सेवा भरती, किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जावीत. यासाठी परीक्षा होणे गरजेचे आहे.
- प्रा. आर. आर. पाटील
एमपीएससीद्वारे होणारी पदभरती असो वा शिक्षक, पोलीस, तलाठी, ग्रमासेवक या पदांसाठी भरती होईल या आशेवर मुले अभ्यास करत आहेत. मात्र, पद भरती न करता शासन ‘तारीख पे तारीख’ जाहीर करत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया तब्बल तीन वर्षे रखडली असल्याने तरुणांत नैराश्य आले आहे.
- भाग्यश्री रेवडेकर, परीक्षार्थी
कोरोना, आरक्षण, बिंदू नामावली तर कधी निधी शिल्लक नाही, अशी कारणे देऊन पद भरतीसाठी शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे उमेदवारांची वयोमर्यादा उलटून जात असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये नैराश्य वाढले आहे. काही उमेदवार आत्महत्येचा मार्ग कवटाळत आहेत. एमपीएएसीद्वारे महिनाअखेर पदभरतीचे आश्वासन शासन पाळेल का?
- राहुल खरात, परीक्षार्थी
स्पर्धा परीक्षेसाठी रत्नागिरी शहर व जिल्ह्यात मोजकेच वर्ग असून सध्या ऑनलाईन मार्गदर्शन सुरू आहे. जिल्ह्यातून अडीच ते तीन हजार विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत.
रत्नागिरी शहरात स्पर्धा परीक्षेसाठी मोजकेच वर्ग असल्याने काही विद्यार्थी पुणे, मुंबई, कोल्हापूरसारखे शहर गाठत असून तेथे वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. घराबाहेर राहून खर्च वाढत आहे.
कोरोनामुळे गेले दीड वर्ष ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे शहराबाहेर गेलेले विद्यार्थी घरी परतले आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.
नेटवर्कअभावी मार्गदर्शन वर्गात खंड पडत आहे. इंटरनेट, वायफायसाठीचा खर्च वाढत आहे. शासनाने आता तरी स्पर्धा परीक्षा वेळेवर घेऊन पदभरती करावी तसेच ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देऊन मुलांचे नुकसान टाळावे.