ऑनलाइन सुविधा वापरण्यासाठी महावितरणचे ग्राहकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:35+5:302021-04-12T04:29:35+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक वीजबिल भरणा केंद्रावर जाणे टाळतात. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने महावितरण कंपनीने सर्व प्रकारच्या ...
रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक वीजबिल भरणा केंद्रावर जाणे टाळतात. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने महावितरण कंपनीने सर्व प्रकारच्या ऑनलाइन सुविधा सुसज्ज ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील वीज ग्राहकही मोठ्या प्रमाणात मोबाइल अॅप आणि ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा वापरत असून, सद्यस्थितीत ग्राहकांनी मोबाइल अॅपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेले वर्षभर सर्व जनता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लढत आहे. लॉकडाऊन काळातही नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी, दवाखाने, पाणीपुरवठा, दिवे आणि अन्य सुविधा सुरू ठेवण्यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत आहेत. बाधित क्षेत्रातही वीजपुरवठा अविरत सुरू ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जिवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.
महावितरण कंपनीच्या सुधारित मोबाइल अॅपमध्ये ग्राहकांना वीजदेयक पाहता तसेच भरणा करता येते शिवाय अॅपद्वारे नवीन वीज जोडणी अर्ज, नावातील बदलासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बाधित क्षेत्र असल्याने वीज मीटर रीडिंग घेणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत महावितरण मोबाइल अॅपद्वारे ग्राहकांना मीटर रीडिंग पाठविणे शक्य झाले आहे. आपले चालू वीज देयक, मागील देयके, भरणा इतिहास, बिल भरण्याची सुविधा तसेच अनेक सुविधा मोबाइल अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ याद्वारे ग्राहक आपली समस्या नोंदवू शकतात, अथवा www.mahavitaran.in मधील सर्व प्रकारच्या ऑनलाइन पद्धतीने सुविधांचा लाभ घेऊन प्रत्यक्ष संपर्क टाळावा, शक्यतो कार्यालयात प्रवेशासाठी आग्रह करू नये तसेच आपले वीज देयक वेळेवर ऑनलाइन पद्धतीने भरणा करावे व कोरोना विरोधाचा लढा यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे.