महावितरणची दीड लाख ग्राहकांकडे ५२ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:14+5:302021-06-04T04:24:14+5:30

रत्नागिरी : मे महिन्यात झालेल्या ताैक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची यंत्रणाच कोलमडल्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. महावितरणच्या अधिकारी, ...

MSEDCL owes Rs 52 crore to 1.5 lakh customers | महावितरणची दीड लाख ग्राहकांकडे ५२ कोटी थकबाकी

महावितरणची दीड लाख ग्राहकांकडे ५२ कोटी थकबाकी

Next

रत्नागिरी : मे महिन्यात झालेल्या ताैक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची यंत्रणाच कोलमडल्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भर पावसात जोखीम घेत वीज पुरवठा सुरळीत केला. यानंतर वीज कामगारांचे कौतुक, सत्कार करण्यात आले. एकीकडे महावितरणचे कौतुक करण्यात येत असले तरी वीजबिले वेळेवर भरली जात नसल्यामुळे थकबाकी मात्र वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६० हजार ९०३ ग्राहकांकडे ५२ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे.

कोरोना काळातही महावितरण कंपनी अविरत वीज पुरवठा करत आहे. सर्व रूग्णालये, विलगीकरण केंद्र तसेच घरांमधील मीटर रिडिंग घेणे कठीण असूनही मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. ऑनलाईन अ‍ॅप, एसएमएसद्वारे रिडिंग स्वत: अपलोड करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून विजेच्या वापराप्रमाणे अचूक वीज देयके मिळू शकतील. मे महिना अखेरीस ग्राहकांना वीज देयके वितरीत करण्यात आली होती. मात्र, मे महिना अखेरीस खेड विभागातील ४० हजार ६६९ ग्राहकांकडे १३ कोटी ५३ लाख, चिपळूण विभागातील ३९ हजार ९७ ग्राहकांकडे १३ कोटी ९४ लाख, तसेच रत्नागिरी विभागातील ८१ हजार १३७ ग्राहकांकडे २५ कोटी तीन लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील एकूण एक लाख ६० हजार ९०३ ग्राहकांकडे ५२ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे.

गतवर्षी निसर्ग, यावर्षी ताैक्ते या दोन्ही वादळांमुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. तरीही ग्राहकांसाठी वीज पुरवठा जोखीम घेत पूर्ववत करण्यात आला. ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल अ‍ॅप तसेच ऑनलाईन पध्दतीने वीज देयके भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने घराबाहेर न पडता बिल भरणे सहज सुलभ होत आहे.

---------------------------

तक्रारी प्रलंबित राहू नयेत

वीज मीटर बंद पडल्याने किंवा अन्य कुठल्याही कारणाने वीज मीटरबाबत तक्रार असल्यास महावितरणकडे ग्राहकांनी संपर्क साधावा. सध्या पुरेसे मीटर जिल्ह्यात महावितरण कंपनीने उपलब्ध करून ठेवले आहेत. यामुळे ग्राहकांच्या मीटरसंबंधी तक्रारी प्रलंबित राहू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

------------------------

लॉकडाऊन काळातही वीजबिले ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा वापर करून प्रत्यक्ष, ऑनलाईन, मोबाईल अ‍ॅपव्दारे वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ

Web Title: MSEDCL owes Rs 52 crore to 1.5 lakh customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.