मान्सूनपूर्व तयारीसाठी महावितरण सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:59+5:302021-04-26T04:28:59+5:30
रत्नागिरी : प्रत्येक पावसाळा हा महावितरणकरिता एक आव्हान असतो. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवकाश असला तरी पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा ...
रत्नागिरी : प्रत्येक पावसाळा हा महावितरणकरिता एक आव्हान असतो. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवकाश असला तरी पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत रहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये व ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कार्यरत असतानाच मान्सूनपूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. महावितरणची बहुतांश यंत्रणा ही उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. काही ठिकाणी त्या तारांना घासत असतात. त्यादृष्टीने संबंधित मालकांची पूर्व परवानगी घेऊन फांद्या छटाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
तारांचे गार्डींग ढिले झाल्याने तारा लोंबकळतात. शिवाय ढिले झालेले स्पॅन टाईट करण्याचे काम सुरु आहे. तसेच दोन खांबांमधील तारांचा झोल पडून जमिनीपासूनचे अंतर कमी होते. अशावेळी तारा ओढून घेणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार एखादा खांब बसविण्याची सूचनाही महावितरणने केली आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये तेल योग्य पातळीपर्यंत आहे का नाही, याची खात्री करण्यात येत आहे. ट्रान्स्फॉर्मरबद्दल आर्थिंग पावसाळ्यापूर्वी मजबूत करून घेणे गरजेचे आहे. डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर, केबल जॉईंट याबाबतही खात्री करण्यात येत आहे. किमान साहित्य हाती बाळगून सुविधा तपासणीचे आवाहन करण्यात आले आहे.
कोट:
पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खांब कोसळणे, तारा तुटणे ट्रान्स्फाॅर्मर जळणे, डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर आदी प्रकार घडतात. त्यामुळे महावितरणने सर्व साहित्यांचा जादा स्टॉक जमा करण्यास प्रारंभ केला आहे. मान्सूनपूर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- देवेंद्र सायनेकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.