महावितरणला ग्राहकांचा ठेंगा, थकबाकी जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 03:52 PM2021-04-02T15:52:40+5:302021-04-02T15:53:55+5:30
mahavitaran Ratnagiri-लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना एके कोरोना व्यापून राहिला आहे आणि सर्वांचेच स्वत:च्या घरात राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. घरी राहणाऱ्या मंडळींना अगदी बाधित झालेल्या परिसरात जीवाची बाजी लावत वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अविरत वीजपुरवठा सुरू ठेवला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर महावितरण कंपनीने वीज देयके देण्यास सुरुवात केली. परंतु वीज ग्राहकांच्या अडचणींचा विचार करून व एकूणच वीजवापर बराच वाढला असल्याने वीजपुरवठा खंडित न करता हप्त्याने बिल भरण्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने आणि महावितरण कंपनीने घेतला होता. सप्टेंबर २०२० पासून सगळ्या वीज ग्राहकांना हप्ते पद्धतीने वीजबिल भरणा करण्याची विनंती केली होती.परंतु, वीज ग्राहकांनी हप्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सातत्याने वाढत राहिली होती.
ऊर्जामंत्र्यांनी १० मार्च रोजी थकबाकीदारांचा पुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे केवळ २० दिवसांत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्लेही करण्यात आले होते. यामुळे थकबाकी वसूल होईल, याची अपेक्षा होती. परंतु, ३१ मार्चअखेर वीज ग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखविल्याचे दिसत आहे.
मोहीम सुरूच राहणार
एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९५,८२८ ग्राहकांची ३४ कोटी ६६ लाख रुपये एवढी थकबाकी शिल्लक आहे. ३१ मार्च संपला तरीही ही थकबाकी वसूल झाली नसल्याने आता कोणती कारवाई होणार, या चिंतेत कर्मचारी पडले आहेत. यामुळेच पूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत आता ही मोहीम थांबविली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वीज तोडण्याचा निर्णय
वाढत्या थकबाकीमुळे एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय १० मार्चपासून ऊर्जामंत्र्यांना घ्यावा लागला.