छातीभर पाण्यात महावितरणचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:08+5:302021-07-14T04:36:08+5:30
राजापूर : महावितरणच्या कामाला नेहमीच शिव्या घातल्या जातात. वीजप्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली वाहिली जाते. पण त्यांचे ...
राजापूर : महावितरणच्या कामाला नेहमीच शिव्या घातल्या जातात. वीजप्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली वाहिली जाते. पण त्यांचे काम किती अवघड असते, कधी कधी जीवावर बेतणारे असते, याची लोकांना कल्पनाही येत नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मोसम या गावात पूर आला होता. मात्र, तिथल्या एका खांबावर पुढील गावाचा वीज पुरवठा अवलंबून होता. त्यामुळे छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन तिथल्या रुपेश महाडिक या कर्मचाऱ्याने त्या खांबावरचा खटका सुरू केला.
राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला आहे. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला आहे. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीजवाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित खंडित करून काम सुरू होते. मात्र, सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढले होते. मात्र, तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू करून पुढची गावे प्रकाशमान केली.