महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:40+5:302021-06-05T04:23:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महावितरणने वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या एकात्मिक ऊर्जा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महावितरणने वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे राज्यातील २५४ शहरांमध्ये पूर्ण केली आहेत. त्यामुळे एक कोटी १५ लाख शहरी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दर्जेदार झाला आहे.
शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेत, केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत महावितरणने ४४ मंडलांतर्गत २५४ शहरांमध्ये २,३०० कोटी रूपयांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्रस्तावित १२० नवीन उपकेंद्रांंपैकी ११९ उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. १००पैकी १०० उपकेंद्राची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांची ४,९८७पैकी ४,९७० कामे पूर्ण झाली असून, प्रस्तावित सर्वच ४,२०७ रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. उच्च व लघुदाबाच्या ३,३४७पैकी ३,०४२ किलोमीटर वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल ६,६९४ किलोमीटरच्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या एरियल बंचचे कामही पूर्ण झाले आहे. शिवाय शहरी भागात ५ लाख ३० हजार ३४० नवीन वीज जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणने देशात सर्वाधिक ४,३६४ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या प्रस्तावित केल्या आणि त्याची कामे १०० टक्के पूर्ण केली आहेत. शहरी भागातील उपरी वाहिन्यांचे जाळे कमी करणे, यंत्रणेतील बिघाडाचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.