मुग्धा पोखरणकर सीईटी परीक्षेत खुल्या गटात मुलींमध्ये प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:26 PM2019-06-05T12:26:25+5:302019-06-05T12:28:13+5:30
सीईटी परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान रत्नकन्या मुग्धा महेश पोखरणकर हिने मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला ९३.३८ टक्के गुण मिळाले असून, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी (पीसीएम) परीक्षा दिली होती. पीसीएममध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला आहे. अभियंता होण्याचे व्दार खुले असतानाही तिला शिक्षक व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया मुग्धा हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : सीईटी परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान रत्नकन्या मुग्धा महेश पोखरणकर हिने मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला ९३.३८ टक्के गुण मिळाले असून, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी (पीसीएम) परीक्षा दिली होती. पीसीएममध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला आहे. अभियंता होण्याचे व्दार खुले असतानाही तिला शिक्षक व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया मुग्धा हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
मुग्धाचे वडील डॉक्टर असून, गोळप येथे त्यांचा दवाखाना आहे, आई पल्लवी गृहिणी आहे. मुग्धा सुरूवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी असून बालवाडीपासून बारावीपर्यंत तिने अभ्यासातील चुणूक कायम ठेवली आहे. पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती तिने मिळविली असून, विविध शालेय व शालाबाह्य परीक्षेत यश संपादन केले आहे.
दहावीला तर तिने शंभर टक्के गुण मिळविले होते. अकरावीसाठी तिने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बारावीमध्ये ९३.३८ टक्के मिळविले. सीईटी (पीसीएम) ची परीक्षा मुग्धाने दिली होती. तिला पीसीएममध्ये ९९.९९ गुण प्राप्त झाले असून, राज्यात खुल्या प्रवर्गात मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
मुग्धा ही बारावीला असताना महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासाचे तासवगळता दररोज सात ते आठ तास अभ्यास करीत असे. अभ्यासाशिवाय तिला वाचनाची आवड आहे. त्यामुळे विविध लेखकांची तिने पुस्तके आतापर्यंत वाचली आहेत. भविष्यात बीएसस्सी, एमएसस्सी करून शिक्षक होण्याची मनीषा आहे. सीईटी परीक्षेतील यशामुळे अभियंता होण्याचा मार्ग खुला झाला असला तरी त्याकडे न वळता तिने बीएस्सीच्या प्रथम वर्गासाठी प्रवेश घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी आई-वडिलांचाही भक्कम पाठिंबा आहे.
नियमित अभ्यासाबरोबरच सीईटीचा अभ्यास केला. अधिक लक्ष बोर्डाच्या परीक्षेवर केंद्रित केले होते. मात्र वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी सीईटी परीक्षा दिली होती. त्यासाठी विविध पेपर सोडविण्याचा सराव केला होता. राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असल्याचा विश्वास पटत नाही परंतु यशाबद्दल खात्री होती. यश मिळाले तरी बीएसस्सी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणार आहे.
- मुग्धा महेश पोखरणकर
मुग्धा हुशार आहे. बालवाडीपासून सीईटी परीक्षेपर्यत तिने अभ्यासातील प्रगती कायम ठेवली आहे. बारावी परीक्षेकडे प्राधान्याने लक्ष होते, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी परीक्षा दिली होती. परंतु त्याचवेळी तिने मी शिक्षकच होणार अशी मनिषा व्यक्त केली होती. आम्हा उभयतांना तिच्या यशाची खात्री होती, परंतु तिची शिक्षक होण्याची इच्छा असल्याने आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे.
- पल्लवी महेश पोखरणकर, आई.