'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' लाभार्थी महिलांनीच टीकाकारांना उत्तर द्यावे, पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन 

By मनोज मुळ्ये | Published: July 6, 2024 05:55 PM2024-07-06T17:55:50+5:302024-07-06T17:56:04+5:30

रत्नागिरी : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. मात्र या योजनेवर काहीजणांनी टीका सुरू ...

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Only Women Beneficiaries Should Answer Critics, Urges Guardian Minister Uday Samant | 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' लाभार्थी महिलांनीच टीकाकारांना उत्तर द्यावे, पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन 

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' लाभार्थी महिलांनीच टीकाकारांना उत्तर द्यावे, पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन 

रत्नागिरी : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. मात्र या योजनेवर काहीजणांनी टीका सुरू केली आहे. आता या योजनेचा लाभ मिळल्यानंतर लाभार्थींनी शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण करुन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात या योजनेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडित, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये उपस्थित होते.

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री सामंत यांनी आभार मानले. राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी ४६ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकाच दिवशी ५ हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आजचा कार्यक्रम हा राज्यातील एकमेव कार्यक्रम आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहचविणे अधिकाऱ्यांशिवाय शक्य नव्हते, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो, असे मंत्री सामंत म्हणाले.

ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही. वर्षानुवर्षांसाठी आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूर्वा पेठे यांनी केले. तर श्री. हावळे यांनी सर्वांचे आभार मानले.

मध्यस्थांना थारा नको

महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.

योजना लाभार्थींपर्यंत न्या

जिल्ह्यातील साडेपाच लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.

Web Title: Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Only Women Beneficiaries Should Answer Critics, Urges Guardian Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.