रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By अरुण आडिवरेकर | Published: August 30, 2022 07:03 PM2022-08-30T19:03:41+5:302022-08-30T19:17:29+5:30
या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार
रत्नागिरी : रत्नागिरी, जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे पर्यायाने वस्तूंच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे याबाबत बैठक पार पडली. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, सध्याच्या काळामध्ये वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये हा खर्च १६ टक्क्यांपर्यंत आहे. या खर्चामध्ये मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून सुमारे ६ ते ७ टक्के बचत करता येणे शक्य आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य असून, हे पार्क झाल्यानंतर राज्याची प्रगती अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले की, राज्यामध्ये या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क झाल्यामुळे रत्नागिरी येथून आंबा, काजू, नाशिक, सांगली, जळगाव इत्यादी भागातून द्राक्ष, नागपूर येथून संत्री, अकोला येथून डाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातून साखर यांची निर्यात करणे अधिक
सोयीचे होणार आहे. या माध्यमातून निर्यात व्यवसायास गती मिळणार असून, या भागाच्या विकासामध्ये भर पडणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सामंजस्य करारानुसार पार्क
महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, राष्ट्रीय महामार्ग लॉजीस्टिक मॅनेजमेंट आणि रेल्वे विकास निगम लि. या विभागाच्या सामंजस्य करारानुसार हे पार्क तयार होणार आहेत. या पार्कसाठी आवश्यक असणारी जागा राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचे प्रस्ताव उद्योग विभागातर्फे तातडीने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवले जाणार आहेत.
निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार
कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी मंत्री उदय सामंत यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले असून, निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.