जिल्ह्यात बहुरंगी लढती

By Admin | Published: February 13, 2017 11:12 PM2017-02-13T23:12:38+5:302017-02-13T23:12:38+5:30

४९१ उमेदवार रिंगणात : जि.प.साठी १७५, पं.स.साठी ३१६ उमेदवार

Multicolored battles in the district | जिल्ह्यात बहुरंगी लढती

जिल्ह्यात बहुरंगी लढती

googlenewsNext


सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीतून तब्बल १५१ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी १७५ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ३१६ असे एकूण ४९१ उमेदवार निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदमधून ५१ तर पंचायत समिती निवडणुकीतून १०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १ ते ६ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत विक्रमी ६५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत जिल्हा परिषदेचे ५ तर पंचायत समितीचे ६ उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले होते. या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी २२६ तर पंचायत समितीसाठी ४१६ उमेदवार रिंगणात होते. तर १३ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हा परिषदेच्या २२६ उमेदवारांपैकी ५१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १७५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४१६ उमेदवारांपैकी सोमवारी १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांसह जनता दल, अपक्ष, बंडखोर उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. (प्रतिनिधी)
काँग्रेससह शिवसेना, भाजपात बंडखोरी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील शिवसेना आणि भाजपमधील काही जागांवरील बंडखोरी कायम राहिली आहे. यात प्रकर्षाने काँग्रेसमध्ये कणकवली तालुक्यातील फोंडा, कुडाळ तालुक्यातील नेरूर तर शिवसेनेमध्ये कुडाळ तालुक्यातील माणगाव, भाजपमध्ये पिंगुळी मतदारसंघात, कणकवली तालुक्यातील कासार्डे मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे.
आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ रोजी संपून चित्र स्पष्ट झाले आहे. आता उद्या दि. १४ पासून १९ पर्यंत सहा दिवस प्रचारासाठी अवधी मिळणार आहे. त्यामुळे दिवसरात्र करुन ग्रामीण भाग पिंजून काढला जाणार आहे.
मुख्यमंत्री बुधवारी कुडाळात
राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा कुडाळ येथील एस. टी. महामंडळाच्या ग्राउंडवर होणार आहे. या सभेची भाजपाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री या सभेत शिवेसेनेला की, नारायण राणे यांच्यावर ‘प्रहार’ करणार याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. ंं

Web Title: Multicolored battles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.