मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:26 PM2020-08-31T12:26:09+5:302020-08-31T12:27:15+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. गौरी - गणपतीला निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे गेले काही महिने शुकशुकाट असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा वाढली आहे.
गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.
महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहने नेताना चालकांचा कस लागत आहे. जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम रविवारी सकाळी सुरू होते. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
जोडरस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ बुजवून घ्यावेत, अशी मागणी चालक आणि प्रवाशांनी केली आहे.