मुंबई - गोवा महामार्ग : गणपतीपूर्वी महामार्गावरील खड्डे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:52 PM2018-09-05T15:52:45+5:302018-09-05T15:55:20+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरी : जिल्ह्यात आता गणेशोत्सवासाठी होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू झाले असून, ते गणेशोत्सवापूर्वी पुर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पहिलाच जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महामार्गावरील खड्ड्यांची जिल्हाधिकारी चव्हाण यांनी २२ व ३१ रोजी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात संबंधित विभागांना हे खड्डे भरण्याच्या तातडीने सूचना दिल्या. त्यानुसार आता हे खड्डे भरण्यात आल्याने महामार्गावर नक्की फरक पडेल, असे ते म्हणाले.
तसेच आता पाऊस कमी झाला असून, हे काम मार्गी लागेल तसेच यापुढे सातत्याने खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू राहील, पाऊस थांबताच काम अधिक गती घेईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, येत्या ८ रोजी बांधकाम राज्यमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी हे खड्डे भरण्याचे काम बहुतांश पूर्ण झालेले असेल, असे ते म्हणाले.
आजच्या लोकशाही दिनात सात विभागांसंदर्भात एकूण २२ अर्ज आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महसूल विभागाचे ४, जिल्हा परिषद ८, पोलीस अधीक्षक २, नगरपालिका ४, सहनिबंधक कार्यालय १, भूमी अभिलेख २, बांधकाम विभागासंदर्भात १ अशा अर्जांचा समावेश आहे.