महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती
By अरुण आडिवरेकर | Published: August 26, 2022 05:01 PM2022-08-26T17:01:19+5:302022-08-26T17:01:52+5:30
महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले
रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील पाली (मठ) येथे महामार्गावरच आंदाेलन केले. प्रतिकात्मक गणपती विराजमान करुन पदाधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती केली.
मुंबई - गाेवा महामार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. गणेशाेत्सवासाठी मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार असून, त्यांचा प्रवास सुखकर हाेण्यासाठी मनसेतर्फे आंदाेलन करण्यात आले. महामार्गावरील पाली (मठ) येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाआरती केली.
त्यानंतर प्रतिकात्मक गणेशाच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी महामार्गाची युद्धपातळीवर डागडुजी करण्याची मनसेच्या दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.
जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, दक्षिण रत्नागिरी संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, लांजा तालुकाध्यक्ष मनोज देवरुखकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव सहभागी झाले हाेते. तसेच मनकासे जिल्हा चिटणिस सुनील साळवी, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, महेश मयेकर, लांजा शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर, महिला शहर अध्यक्ष स्वरा राजेशिर्के, अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, जयेश फणसेकर, सोम पिलणकर तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील अनेक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.