पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्ग रडवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:00 PM2019-05-13T23:00:49+5:302019-05-13T23:00:55+5:30
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व ...
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व खेडमध्येही जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीनमालकांनी चौपदरीकरणाच्या कामाला विरोध केल्याने अनेक ठिकाणी काम बंद पडलेले आहे. निवडणुकीच्या काळात चौपदरीकरण कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. अपूर्ण स्थितीत भराव ओढलेला असून, पावसाळ्यात ओढ्यांच्या येणाऱ्या पाण्याला वाव करून दिलेला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येणार आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग वाहनचालकांना रडविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील खेड व चिपळूण विभागात काही भागवगळता वेगाने काम सुरू झाले. रत्नागिरी विभागातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये वर्षभर काम रखडले. आता रस्ता रुंद करण्याचे, कटिंग्ज काढण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी कापलेल्या डोंगराच्या कडांमुळे माती महामार्गावर आली आहे. ही माती रुंदीकरणासाठी पसरण्यात आली आहे. कटिंग्ज काढली असली तरी पावसाळ्यात माती फुगून दरडी रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे.
उपाययोजना आवश्यक
महामार्ग चौपदरीकरणाचे अपुरे काम, पसरलेली माती, महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्यात अपघात होऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना चौपदरीकरणातील ठेकेदार तसेच महामार्ग विभागाने कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आरवली ते वाकेडपर्यंत केवळ १० टक्केच
जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कांटे व बावनदी ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांचे काम खूपच रेंगाळले आहे. जेमतेम १० टक्के काम झाले आहे. जिल्ह्यात अन्यत्र ५० टक्के काम झाले आहे. हे काम वेग कधी घेणार? असा सवाल आता करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी विभागातील मंद कामामुळे या दोन टप्प्यांच्या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्शन घेण्यात आली आहेत.
जमीनमालकांचा इशारा
महामार्ग प्रकल्पासाठी जमीनमालकांना आतापर्यंत खेडमध्ये ३५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र, अद्याप १०० कोटींचा मोबदला देणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ठेकेदाराला काम करू देण्यास विरोध केला आहे. जमीन मालकांच्या विरोधामुळे भरणे, भोस्ते, लोटे, वेरळ भागात चौपदरीकरण काम रखडले आहे. मुसळधार पडणाºया पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.