मुंबई उच्च न्यायालयाचा खेड नगराध्यक्षांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:30+5:302021-09-21T04:34:30+5:30

खेड : राज्य शासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ...

Mumbai High Court reassures Khed mayor | मुंबई उच्च न्यायालयाचा खेड नगराध्यक्षांना दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाचा खेड नगराध्यक्षांना दिलासा

Next

खेड : राज्य शासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे, राजकीय सूडबुद्धीने यंत्रणेला हाताशी धरून ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर परिषदेतील शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याचा अहवाल रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारला पाठवला होता. या तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याविरोधात नगराध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीसला स्थगिती दिल्याची माहिती वैभव खेडेकर यांनी दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, मी केलेले काम विरोधकांना पसंत पडले नसावे, त्यांनी याबाबत सभागृहात एकदाही न बोलता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी झाली होती व त्यावेळी आमची आम्ही बाजू मांडली होती. तरीही शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने या कारणे दाखवा नोटीसला स्थगिती दिली आहे. आपले जनसेवेचे काम भविष्यात असेच चालू राहील व खेडच्या नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विरोधकांनी सूडबुद्धीने केलेले राजकारण जनतेला समजते, असेही ते यावेळी म्हणाले.

---------------------

‘ते’ नगरसेवक कोण?

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी मला भेटून राजकीय दबावाखाली तक्रार दाखल केल्याचे सांगितल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यावेळी दिली. त्यामुळे नगराध्यक्षांनी उल्लेख केलेले ‘ते’ नगरसेवक काेण याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Mumbai High Court reassures Khed mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.