काेराेनाकाळात पाेलीस पाटलांची जीवाची मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:17+5:302021-04-21T04:31:17+5:30
पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ...
पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड येथील पोलीस पाटील गेले दोन वर्षे मुंबईत जाऊन राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गावाची सुरक्षा रामभरोसे टाकून जाणाऱ्या या पोलीस पाटलांनी राजीनामाही दिलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड हे गाव वेळवंड आणि कोठारेवाडी असे दोन महसुली गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावाची सध्याची लोकसंख्या अंदाजे ३ हजारांच्या आसपास आहे. शासनाने या गावाला गावाची सुरक्षा राखण्यासाठी एक पोलीस पाटील दिला आहे. शासनाच्या निकषानुसार पोलीस पाटील कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. यामुळे काही वर्षांपूर्वी सदरची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सदरचे पद अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री आल्याने एका महिलेची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आली.
गेले काही वर्षे पोलीस पाटलांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, वर्षभर कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाच ‘गावाची सुरक्षितता रामभरोसे’ टाकत त्यांनी मुंबई गाठली. आजपर्यंत त्या गावात परतल्याच नाहीत. येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत नाहीत, अशी माहिती दिली. पाेलीस पाटलांना गावात यायला तरी सांगा, अथवा त्यांचा राजीनामा तरी घ्या? अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, ठीक आहे, असे म्हणून या प्रमुखांनी गाव प्रमुखांची बोळवण केली आणि हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला आहे.