मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र घरबसल्या मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:44+5:302021-04-12T04:28:44+5:30
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार आहे. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना ...
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार आहे. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेने परवानगी दिली आहे.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर विद्यापीठात किंवा परदेशी शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याकरिता स्थलांतर प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. आवश्यक शुल्क विद्यापीठात भरल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये विद्यापीठाकडून चुका करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुका दुरुस्तीसाठी विद्यापीठामध्ये तीन ते चार फेऱ्या माराव्या लागतात. मुंबई विद्यापीठाची भौगोलिक व्याप्ती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईत यावे लागते. यासाठी किमान दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो, तसेच वेळेचा अपव्यय होऊन त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी युवासेनेने स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेने मंजुरी दिली.
त्यामुळे आता विद्यार्थ्यांना घरबसल्या स्थलांतर प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. विद्यार्थी देश-विदेशात असला तरी त्या पत्त्यावर स्थलांतर प्रमाणपत्र विद्यापीठाकडून कुरियरमार्फत पाठवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.