मुंबईकर यावर्षीही गावापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:26+5:302021-05-01T04:29:26+5:30
रत्नागिरी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काेकणात येणाऱ्यांना ई - पास बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची ॲन्टिजेन ...
रत्नागिरी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काेकणात येणाऱ्यांना ई - पास बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत असून, क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने गाड्याही रद्द केल्याने मुंबईकरांना गावी येणे सहजशक्य हाेणार नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईकरांना उन्हाळ्याची सुट्टी मुंबईतच घालवावी लागणार आहे.
मुलांच्या परीक्षा संपल्या की, उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर माेठ्या संख्येने गावी येतात. मुंबईकरांना गावी येण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर वाटत असल्याने या हंगामात रेल्वे गाड्यांचे आरक्षणही फुल्ल हाेऊन जाते. काेकण रेल्वे मार्गावरील गाड्याही प्रवाशांनी भरून वाहतात. मात्र, गेल्यावर्षीपासून राज्यात आलेल्या काेराेनाच्या संकटामुळे मुंबईकरांना गावी येणे शक्य झाले नव्हते. गावी येण्यासाठी अनेक निर्बंधांचे अडथळे पार करावे लागल्याने मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यातच गावी आल्यानंतर क्वारंटाईन व्हावे लागल्याने वादाचे प्रसंग निर्माण झाले हाेते.
कोरोनामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणात येण्यासाठीही कडक बंधने घालण्यात आली आहेत. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक असून, जिल्ह्याच्या सीमेवर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणीही केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची, प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. तसेच कोकणात प्रवेश केल्यानंतर हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारत १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरही आता ठराविक गाड्या धावत असल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या चार गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. काेकणात येताना निर्बंधांची शर्यत पार करावी लागणार आहे. या निर्बंधांमुळे मुंबईकरांनी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्या रद्द
एच निजामुद्दीन-मडगाव जंक्शन राजधानी सुपरफास्ट (गाडी क्रमांक ०२४१४) ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिलपासून रद्द केली आहे. एच मडगाव जंक्शन-निजामुद्दीन सुपरफास्ट (क्रमांक ०२४१३) २ मेपासून, करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट (क्रमांक ०२१२०) २८ एप्रिलपासूनच, मुंबई सीएसएमटी-करमाळी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक ०२११९), मंगळूर-लोकमान्य टिळक टर्मिनस डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी (क्रमांक ०२६२०), मडगाव जंक्शन-मंगळूर सेंट्रल आरक्षित गाडी एक्स्प्रेस विशेष गाडी (क्रमांक ०७१०७) आणि मंगळूर- मडगाव जंक्शन राखीव विशेष गाडी (क्रमांक ०७१०८) २९ एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर सेंट्रल डेली सुपरफास्ट गाडी (क्रमांक ०२६१९) ३० एप्रिलपासून रद्द केली आहे.