मुणगेकर समितीचा अहवाल आठ वर्षांनंतरही दुर्लक्षित; स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विद्यापीठ देण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:52 AM2019-05-18T04:52:14+5:302019-05-18T04:52:26+5:30
अहवाल सरकारने धूळ खात ठेवला आहे. आसपास कोठेही समुद्र नाही अशा ठिकाणी मत्स्य विद्यापीठ उभारणाऱ्या राजकीय लोकांना कोकणात मत्स्य विद्यापीठ उभारण्याची गरज लक्षात येत नाही, हे कोकणाचे दुर्दैव आहे.
- मनोज मुळ्ये
रत्नागिरी : कोकणात स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ करायचे झाले तर काय काय करायला हवे, त्याची गरज किती आहे, त्याचा उपयोग किती आहे यासह अनेक गोष्टींचा उहापोह करणारा अहवाल माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी २0११ मध्ये सरकारला सादर केला. मात्र गेली आठ वर्षे हा
अहवाल सरकारने धूळ खात ठेवला आहे. आसपास कोठेही समुद्र नाही अशा ठिकाणी मत्स्य विद्यापीठ उभारणाऱ्या राजकीय लोकांना कोकणात मत्स्य विद्यापीठ उभारण्याची गरज लक्षात येत नाही, हे कोकणाचे दुर्दैव आहे.
१९९८ साली नागपूर पशु, मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली. २000 सालापासून ते कार्यरत झाले. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी या विद्यापीठांतर्गत दोन महाविद्यालये सुरू झाली. या विद्यापीठाच्या संलग्नतेतून सरकारने रत्नागिरीतील शिरगाव मत्स्य महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचे उपक्रम असलेले मुंबईतील तारापोरवाला संशोधन केंद्र, रत्नागिरीचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पनवेलचे खारभूमी संशोधन केंद्र आणि सिंधुदुर्गातील मुळदे येथील मत्स्यव्यवसाय संशोधन केंद्र यांना वगळण्यात आले. त्यावेळी कोकणासाठी स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ हवे असा मुद्दा सातत्याने पुढे आला.
त्यामुळे सरकारने नियोजन आयोगाचे माजी सदस्य, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमला. या अभ्यासगटात अन्य सात सदस्यांचा समावेश आहे.
७२0 कि.मी. एवढी लांबी असलेल्या कोकणातील समुद्रकिनाºयावर सहा सागरी जिल्ह्यात ५00 मासेमारी गावे आहेत. दरवर्षी सुमारे ३ लाख टन मासळीचा खाण्यासाठी थेट तर दीड लाख टन मासळीची निर्यात होते. त्यातून दरवर्षी अडीच हजार कोटींची उलाढाल होते. १२ हजार ९९५ हेक्टर इतके क्षेत्र निमखाºया पाण्यातील मत्स्यव्यवसायासाठी पूरक आहे आणि त्यातील केवळ ७९६ हेक्टर क्षेत्राचाच त्यासाठी वापर होत आहे.
विद्यापीठाकडून नवे उपक्रम नाहीच!
समुद्र नाही, गोड्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण कमी. तरीही अट्टाहास म्हणून नागपूरला स्थापन झालेल्या महाराष्ट्र पशु, मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठाचे पहिली सहा वर्षे एकही महाविद्यालय नव्हते. २000 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठांतर्गत नागपूर मत्स्य महाविद्यालय आणि उदगीर येथील मत्स्य महाविद्यालय २00६-0७मध्ये सुरू झाले आहे. हे विद्यापीठ सुरू झाल्यापासून आजपर्यंत दोन महाविद्यालयांखेरीच त्याचे काहीही उपक्रम नाहीत. त्याउलट रत्नागिरीतील शिरगाव मत्स्य महाविद्यालयाची मुंबई, पनवेल येथे एक-एक आणि सिंधुदुर्गात दोन अशी चार संशोधन केंद्रे नियमित स्वरूपात कार्यरत आहेत. गेल्या २0 वर्षात रत्नागिरीतून मत्स्य शिक्षण घेतलेल्यांची संख्या नागपूर आणि उदगीरच्या तुलनेने कितीतरी अधिक आहे. मत्स्य निर्यातीमधून कोकणातील समुद्रकिनारे देशाला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देत आहेत. या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. मात्र तरीही कोकणात मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ करण्याची गरज ना आघाडी सरकारला वाटली, ना युती सरकारला.
फेब्रुवारी २00८ मध्ये गठीत झालेल्या या अभ्यासगटाने तीन वर्षे देशभरातील मत्स्य विद्यापीठांचा अभ्यास करून २0११ मध्ये अहवाल सादर केला. त्यानुसार देशात १६ मत्स्य महाविद्यालये कृषी विद्यापीठांशी संलग्न आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांसह अनेकांनी मत्स्य खाते पशु खात्यापासून वेगळे केले आहे. त्यामुळे तेथे मत्स्य विद्यापीठांची गरज खूप वर्षांआधीच लक्षात घेऊन त्यानुसार काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आणि लोकप्रतिनिधींना मात्र अजूनही त्याची गरज वाटलेली नाही. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ उभारण्याचा अहवाल आठ वर्षे लाल फितीत धूळ खात पडूनच आहे.