पालिका जाणार उच्च न्यायालयात
By admin | Published: March 9, 2015 09:33 PM2015-03-09T21:33:27+5:302015-03-09T23:55:22+5:30
घनकचरा प्रकल्प : जिल्हासत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार
रत्नागिरी : दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारणीस मनाई करणारा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच दिला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे पालिका सुत्रांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यासाठी पालिका पदाधिकारी व अधिकारी कामाला लागले आहेत. शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील दांडेआडोम येथील अडीच एकर जागा रत्नागिरी पालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी २००० साली खरेदी केली होती. त्यानंतर या जागेकडे जाण्यासाठी आवश्यक रस्त्याची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे दहा वर्षांचा कालावधी या वादातच वाया गेला.
दोन वर्षांपूर्वी पालिकेने रस्त्याची जागा संपादीत करून मिळावी, असा अर्ज जिल्हा प्रशासनाकडे केला होता. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रस्त्याची जागा संपादन करून पालिकेच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व तत्कालिन मुख्याधिकारी यांनी दांडेआडोम येथे जाऊन तेथील सरपंच व नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळीही या प्रकल्पाला विरोधच झाला. त्यानंतर हे प्रकरण प्रथम दिवाणी न्यायालयात गेले. तेथे ग्रामस्थांचे आक्षेप न्यायालयाने फेटाळले. अखेर तेथील गंगाराम आंबेकर, सुहास मुळ्ये, हरी माने, प्रकाश आंबेकर, रवींद्र पवार, पुरषोत्तम दांडेकर यांच्यासह १९ ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात १२ फेबु्रवारी २०१५ रोजी याचिका दाखल केली होती.
या प्रकल्पाबाबत पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला सखोल माहिती नाही. तसेच पक्षकार जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी बाजू मांडण्यात आलेली नाही, असे नमूद करीत जिल्हा सत्रन्यायाधीश १ जे. पी. झपाटे यांनी दांडेआडोम हे ठिकाणी घनकचरा प्रकल्प नियमात बसणारे नाही, असा निर्णय दिला
आहे. जिल्हा सत्रन्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी याचिका पालिकेतर्फे उच्च न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)