दुसरे लग्न टिकण्यासाठी आर्याचा खून; मालिका बघून आत्महत्या केल्याचा केवळ बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:36 PM2022-06-21T17:36:56+5:302022-06-21T18:29:30+5:30
पती राजेश यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा खून केला आहे. सुनंदा चव्हाण आणि नणंद अनिता चांदेकर यांनी मुलीचा खून केला
लांजा : तालुक्यातील काेर्ले येथील सात वर्षीय आर्याच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच ही आत्महत्या नसून खूनच असल्याची तक्रारी तिच्या आईने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने केलेले दुसरे लग्न टिकावे आणि उघडकीला येऊ नये यासाठीच आर्याचा खून केल्याचे आई माया चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या चिमुकलीने घराच्या भिंतीच्या खिळ्याला गळफास तयार करुन गळफास घेतल्याची घटना दि. १२ जून रोजी घडली हाेती. शनिवारी आर्याची आई माया राजेश चव्हाण (वय ३४, रा. बी. बी. वडगाव, ता. फलटण) हिने लांजा पोलीस स्थानकात येऊन हा खून असल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सावत्र सासू सुनंदा सुभाष चव्हाण, चुलत नणंद अनिता नागेश चादेकर, सासरे सुभाष नारायण चव्हाण, दीर दीपक, सुरज, पती राजेश, सवत काजल राजेश चव्हाण (सर्व रा . कोर्ले सहकारवाडी), सेजलचे वडील सर्जेराव नारायण मोहिते (रा. राजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माया चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, राजेश सुभाष चव्हाण यांच्या समवेत दि. १० जुलै २००५ मध्ये विवाह झाला. प्रिया (१६), अनुजा (१२), आर्या या तीन मुली आहेत. मुलगा होत नसल्याने ते माझा मानसिक छळ करीत होते. या छळाला कंटाळून दीड वर्षापूर्वी माहेरी फलटण येथे राहण्यासाठी गेले हाेते. माहेरी गेल्याचा फायदा उठवत कायदेशीर सोडचिठ्ठी न घेता पतीने दुसरे लग्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरे लग्न केल्यामुळे आल्यावर गुन्हा दाखल हाेईल या भीतीपाेटी राजेशने माया यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक केले. या चांगल्या वागण्याच्या दरम्यान त्याने आपल्या दाेन मुली अनुजा व आर्या यांना काेर्ले येथे आणले. यावेळी सासू सुनंदा चव्हाण व सवत काजल चव्हाण यांनी दाेन्ही मुलींना त्रास देणे सुरूच ठेवले हाेते. पती राजेश यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा खून केला आहे. सुनंदा चव्हाण आणि नणंद अनिता चांदेकर यांनी मुलीचा खून केला आहे. त्यांना कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केल्याचेही म्हटले आहे.
आधीच संशय
घटनेनंतर आर्याचा मामा व नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी नंतर तुमची तक्रार घेतली जाईल प्रथम शव ताब्यात घ्या, असे सांगितले हाेते. तर मालिका बघून आत्महत्या केली हा केवळ बनाव केला हाेता. बहिणीने आजीच्या दबावापाेटी खाेटा जबाब दिल्याचे माया चव्हाण यांनी म्हटले आहे.