मुंबईतील तडीपार गुंडाचा संगमेश्वरात खून, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:10 PM2023-09-30T12:10:22+5:302023-09-30T12:10:58+5:30
माेबाइलवरून ओळख पटली
देवरुख : माैजे आंबेड खुर्द (ता. संगमेश्वर) येथील रेल्वे बाेगद्याजवळील निर्जन परिसरात ५६ वर्षीय वृद्धाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. हा मृतदेह मुंबईतील तडीपार असलेल्या साजीद इब्राहिम अन्सारी (रा. कुर्ला, तळेवाडी, मुंबई) याचा असून, पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचे तपासात समाेर आले आहे. या खुनाच्या आराेपाखाली संगमेश्वर पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याप्रकरणी अन्सारी याचा मुलगा आरबाज (२४) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सागर संताेष माेहिते (२३), सनी संताेष माेहिते (२१, दाेघे रा. संभाजीनगर, संगमेश्वर), अक्षय राजू साळवे (२५, रा. लाेकमान्यनगर पाडा नं. १, वर्तकनगर, बेस्ट ठाणे), अशी तिघांची नावे आहेत. साजीद इब्राहिम अन्सारी याचा मृतदेह बुधवारी (२७ सप्टेंबर) सकाळी ७:४५ वाजता आंबेड खुर्द तांबेवाडी येथील पायवाटेवर आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
साजीद इब्राहिम अन्सारी रविवारी संगमेश्वर येथे आला होता. त्याचे नातेवाईक देवरुख येथे असल्याने त्यांच्याकडे तो आला हाेता. मुंबईमध्ये असताना संगमेश्वर संभाजीनगर येथील सागर मोहिते, सनी मोहिते आणि ठाणे वर्तकनगर येथील अक्षय साळवे यांच्यामध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहारातून त्यांनी साजीद इब्राहिम अन्सारी याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. रेल्वे रुळाजवळ पडलेल्या एका लाेखंडी पाइपच्या साहाय्याने डाेक्यावर मारहाण करून हा खून केल्याचे समाेर आले आहे.
याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी सागर मोहिते, सनी मोहिते आणि अक्षय साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना साेमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश गावित करत आहेत.
मुंबईतून तडीपार
खून झालेल्या साजीद इब्राहिम अन्सारी याच्यावर यापूर्वी जनावरांची वाहतूक करणे वगैरे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आले हाेते.
माेबाइलवरून ओळख पटली
साजीद इब्राहिम अन्सारी याच्या मृतदेहाजवळ माेबाइल सापडला. या माेबाइलवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या मुलाशी संपर्क साधण्यात आला. त्याने वडिलांचा आदल्या रात्री आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याची माहिती दिली हाेती.