Ratnagiri News: माणगाव येथील लाकूडतोड्याचा खेडमध्ये खून, एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:41 PM2023-01-31T16:41:58+5:302023-01-31T16:42:23+5:30
संशयित आरोपीचा शोध सुरू
खेड : जंगलतोडीसाठी माणगाव येथून खेड येथे आलेल्या लाकूडतोड कामगाराचा त्याच्याच एका सहकाऱ्याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२२ राेजी घडली असून, या कामगाराचा मृतदेह तब्बल एक महिन्यानंतर आंबवली-वरवली गावच्या दरम्यान असणाऱ्या घनदाट जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला. मंगेश गायकवाड असे मृत कामगाराचे नाव असून, याप्रकरणी रविवारी (२९ जानेवारी) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील आंबवली-वरवली या दोन गावांच्या दरम्यान असणाऱ्या भागात जंगलतोड सुरू होती. यासाठी माणगाव (जि. रायगड) येथून लाकूडतोड करणारे कामगार खासगी जंगलतोड करणाऱ्या कंत्राटदाराने मागवले होते. २६ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघांमध्ये वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत मंगेश गायकवाड या कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह दुर्गम जंगलात टाकण्यात आला होता.
दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत या कामगाराचा मृतदेह आढळला. याबाबत खेड पोलिसांना माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच जाऊन शवविच्छेदन केले. हा मृतदेह कोणाचा आहे, या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी खेड पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या आणि याच परिसरात जंगलतोडीसाठी आलेल्या मंगेश गायकवाड या व्यक्तीचा असल्याचे तपासात पुढे आले.
तपासादरम्यान दोन कामगारांमध्ये हाणामारी झाली हाेती. त्यात मंगेश गायकवाड याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान निदर्शनाला आले. त्यानंतर रविवारी खेड पोलिस स्थानकात मंगेश गायकवाड या लाकूडतोड कामगाराला मारहाण करून खून केल्याप्रकरणी एकावर भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित खुन्याला पकडण्यासाठी खेड पोलिसांचे पथक रवाना झाले असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.