मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:45 PM2017-11-01T17:45:12+5:302017-11-01T17:51:23+5:30
मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (४५) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी मंगळवारी सकाळी ९.३० ते सायकांळी ६.१५ यावेळेत धारदार शस्त्राने खून केला.
मंडणगड ,दि. ०१ : तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (४५) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी मंगळवारी सकाळी ९.३० ते सायकांळी ६.१५ यावेळेत धारदार शस्त्राने खून केला.
यासंदर्भात मयत चव्हाण यांच्या पत्नी दीपेश्री राजाराम चव्हाण (४३) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात बुधवारी पहाटे ५ वाजता तक्रार दाखल केली आहे.
प्रथमदर्शनी हा खून चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे भासवण्यात आले असले तरी खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला असले यांचा अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.
पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहीतीनुसार, मयत राजाराम चव्हाण यांचा प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय होता. ते तोंडली ते दापोली या मार्गावर वडापचा व्यवसाय करीत असत. ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी अज्ञाताने त्यांना फोन करुन प्रवासी भाडे सोडण्याकरिता बोलावून घेतले होते.
ते वेळेवर येणार नाहीत, म्हणून अज्ञात मोटारसायकलस्वार घरी आले व त्यांना भाड्यासाठी सोबत घेऊन गेले. भाड्यासाठी गेल्यानंतर उशीरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता, उन्हवरे ते तोंडली मार्गावर पुलाजवळ त्यांची गाडी आढळून आली.
यावेळी मयत यांचा शोघ घेत असताना या पुलाच्या मोरीखाली धारदार तीक्ष्ण हत्याराने शरीरावर अनेक ठिकाणी जबर दुखापती करुन जिवे ठार मारुन टाकण्यात आलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी त्यांची गाडी आढळून आली असली तरी अज्ञातांनी चव्हाण यांचे दोन मोबाईल व सोन्याची चैन असा ४८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला असल्याचे बाब पुढे आली.
अज्ञातांनी केलेला खून हा चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे भासवण्यात आले असले तरी चोरीच्या उद्देशानेच हा खून करण्यात आला होता की, अन्य कारणांसाठी याचा तपास पोलीस करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे यांनी आपल्या पथकासह बुधवारी मंडणगड येथे घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दापोली येथील ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले. मंडणगड पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.