चिपळुणातील रखडलेल्या कामांचा मुस्लीम विकास मंच करणार पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:49+5:302021-03-17T04:32:49+5:30
चिपळूण : रखडलेली आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी शहर परिसराबरोबरच तालुक्यातही चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच ...
चिपळूण : रखडलेली आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी शहर परिसराबरोबरच तालुक्यातही चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच विकासाचा अजेंडा राबवणार आहे. तसेच रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहे. आपल्या न्याय-हक्कांपासून आणि भौतिक सोयी-सुविधांपासून नागरिक वंचित राहू नयेत यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला असल्याची माहिती मुस्लीम विकास मंचातर्फे देण्यात आली.
चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंचचे अध्यक्ष अंवर पेचकर, ॲड. ओवेस पेचकर, अब्दुल वहाब सुर्वे, सदरुद्दीन पटेल, मजर पेचकर, आहीद पेचकर आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नगराध्यक्षा खेराडे व मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांची भेट घेतली. गोवळकोट रोड येथील कब्रस्थानचे सुशोभीकरण व्हावे अशी आमची इच्छा असून ते काम आम्ही संघटनेमार्फत हाती घेऊ इच्छितो. हे कब्रस्थान नगर परिषदेच्या अखत्यारित आहे. त्यामुळे नगर परिषदेने या कामासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. नगराध्यक्षा खेराडे यांनी संघटनेच्या या भूमिकेचे स्वागत करत यासंदर्भात प्रशासनाकडे पत्रव्यवहार करावा, असे सांगितले.
कोट
श्रेयवादाची लढाई
श्रेयवादाच्या लढाईत शहरातील बहुसंख्य विकासात्मक कामे रखडली असून त्यातून नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातून मध्यम मार्ग काढून ती मार्गी लावावीत, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली आहे. मात्र, राजकीय वादात ही कामे अशीच रखडली तर जनतेच्या हितासाठी चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंचला वेगळ्या पद्धतीने त्यावर आवाज उठवावा लागेल. वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावू.
- ॲड. ओवेस पेचकर, चिपळूण.