जिल्ह्यात राबविणार ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:48+5:302021-05-03T04:25:48+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’, ‘कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’, ‘कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेशही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली आहे. रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे चित्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यू दरामध्येही वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने ही नवीन मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व वेळेवर उपचार करणे, हा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये गृहभेटी देण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार असून, त्याचे पाच सदस्य असणार आहेत. त्यामध्ये ग्राम कृती दल, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात येणार आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातही घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी आरोग्य पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरसेवक हे पथक अध्यक्ष असणार असून, वॉर्ड मेंबर, वसुली कर्मचारी, सफाई मुकादम, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आदींचा समावेश शहरी भागासाठी असणार आहे.
हे पथक दररोज कमीत कमी ५० घरांना भेटी देणार आहे. या भेटीदरम्यान घरातील सदस्यांची नाव नोंदणी, ताप, सर्दी, खोकला, आदी लक्षणांची माहिती घेणे, घरातील सर्व सदस्यांची तापमापकाने तापमान घेणे, व्यक्तींना सहा मिनिटे चालविणे, त्यांचे पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन प्रमाण तपासणे, तसेच एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन लेवल ९५ पेक्षा कमी असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.
या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रानाही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयसोलेशन सेंटरची स्थापना करावी. त्यासाठी एखादा हॉल, हायस्कूल, शाळा, आदी ठिकाणी सर्व सुविधा विचारात घेऊन आयसोलेशन सेंटर सुरू करावे. हे पथक कोरोनाबाबत जनजागृतीही करणार आहे.