दापोलीतील डॉल्फिनच्या मृत्यूचे गूढ, एकाच महिन्यात दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 06:06 PM2020-05-25T18:06:09+5:302020-05-25T18:08:26+5:30
दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत डॉल्फिन आढळला आहे.
दापोली : तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत डॉल्फिन आढळला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सालदुरे - पाळंदे समुुद्रकिनारी डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडला होता. ही बाब ग्रामस्थांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत डॉल्फिनला समुद्रकिनारीच खड्डा करून पुरून टाकले होते. ही घटना ताजी असतानाच रविवार, ३ मे रोजी दुसरा मृत डॉल्फिन किनाऱ्याला आल्याचे दिसले.
एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने तर्क वितर्क लढवले जात होते. हा डॉल्फिनदेखील कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच खड्डा काढून पुरला. यावेळी हर्णै परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र प्रीतम साठविलकर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गुहागर येथील समुद्रकिनारीदेखील मृत डॉल्फिन सापडला होता.
दापोली व गुहागरात मृतावस्थेत डॉल्फिन आढळत असल्याने चिंतेची बाब बनली आहे. डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे, याचा शोध घेण्यात अद्यापही वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.
तिसरी घटना
एकाच महिन्यात केवळ २० दिवसांनी पुन्हा एकदा हर्णै-नवानगर येथे डॉल्फिन मृत अवस्थेत सापडला. दापोलीत मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची या दोन महिन्यातली ही तिसरी घटना आहे. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असावा, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.