जंगलाच्या राणीला बेडकांमध्ये रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:18+5:302021-06-02T04:24:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चक्क घनदाट जंगलात बेधडक फिरून वनसंपदेचे रक्षण करतानाच वन्य जीवांनाही संरक्षण देणारी चिपळूणची राणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चक्क घनदाट जंगलात बेधडक फिरून वनसंपदेचे रक्षण करतानाच वन्य जीवांनाही संरक्षण देणारी चिपळूणची राणी प्रभूलकर ऊर्फ ‘अरणी’ ही अद्वितीयच. अरणी अर्थात जंगलाच्या राणीला एक वेगळा छंद जडला आणि त्यातून तिने निसर्गातील पहिले वन्यजीव असलेल्या ‘बेडूक’ या जीवावर पीएच.डी. करण्याचा चंग बांधला आहे.
तालुक्यातील अलोरे येथील पाटबंधारे कॉलनीत राहणाऱ्या राणी प्रभूलकरने कराड जीएम कॉलेजला शिक्षण घेतले. पुढे ती एमएससी झुलॉजीचे शिक्षण घेत आहे. या युवतीने स्वतःच ‘अरणी’ हे नाव धारण केले आहे. ‘अरणी’ म्हणजे अभयारण्याची राणी. पण मुळात तिचा प्रवास एका संकटाने सुरू झाला. सातवीत असताना तिला सर्पदंश झाला; परंतु त्या सापावर सूड न उगवता धाडसाने ती सापांच्या शोधात निघाली. त्यातून पुढे जंगलात भटकंती करत वनसंपदेचे रक्षण आणि वन्यजीवांच्या जाती शोधण्याचा व त्यांचे रक्षण करण्याचा एक वेगळा छंद तिला जडत गेला. अरणीने तालुक्यातील कुंभार्लीच्या जंगलात जणू स्वतःला हरवून घेतले. जंगलात सर्प दिसला की, प्रथम त्याला कॅमेरा बंद करून त्याचा अभ्यास करते़ तसेच त्या सापाला अरण्यात सुरक्षितस्थळी सोडून त्याला जीवदान देणे यामध्ये तिला वेगळाच आनंद मिळताे़
एखादे झाड तुटलेले दिसले तरी तिला दुःख होते. तसेच रानात कुठे आग लागली किंवा वणवा लागला तर तिला वेदना होतात. आग विझवण्यासाठी ती स्वतःच धाव घेते. रात्री-अपरात्री पाऊस, उन्हात जंगलात फिरत असतानाच तिला वन्यजीवाचा लळा लागला. परंतु, सर्वात जास्त तिला बेडूक या वन्यजीवाने प्रभावित केले. बेडकांच्या अनेक प्रजाती तिने शोधून काढल्या आहेत. त्यापैकी काही प्रजातींचा शोध हा ‘अरणी’ ने स्वतःच लावला आहे. अजूनही तिचे हे शोधकार्य सुरूच आहे. बेडूक हा निसर्गातील सर्वात पहिला वन्यजीव आहे. सर्वात सिनियर वन्यजीव बेडूक असल्याचे अरणीचे म्हणणे आहे. पाण्यातून जमिनीकडे मार्गक्रमण करणारे पहिले वन्यजीवही बेडूक आहे. निसर्गाच्या प्रत्येक बदलाचे अनुकरण बेडूक करत असते. त्यामुळे या वन्यजीवावर संशोधन केल्यास निसर्गाची महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, अशी अरणीची ठाम खात्री आहे. त्यामुळे बेडकावर पीएच.डी. करण्याचा अरणीचा उद्देश आहे.
--------------------------
एखाद्या मुलीने सर्पमित्र म्हणून रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे हे आपल्या घरच्यांना व नातेवाईकांना सुरुवातीला आवडत नव्हते. वर्षभर या गोष्टीचा खूप त्रास झाला; मात्र आता या कामात कुटुंबीयांची खूप मोठी मदत होत आहे. तू जे क्षेत्र निवडले आहेस, तुला ज्याची आवड आहे त्यातच तू काम कर असे आता अभिमानाने कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे.
- राणी प्रभूलकर, अलोरे, चिपळूण.