नाचणी वरीचे क्लस्टर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन करावे : अनुप कुमार
By मेहरून नाकाडे | Published: February 25, 2024 08:20 PM2024-02-25T20:20:15+5:302024-02-25T20:20:52+5:30
रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी विविध कृषि योजनांचा आढावा घेतला.
रत्नागिरी : मसाला पिकांचे क्षेत्र वाढ होण्यासाठी एमआरजीएस अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. ‘अॅग्रो टूरिझम’ च्या माध्यमातून ‘स्पाइस गार्डन’ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. पाणी फाऊंडेशन सारख्या उत्कृष्ट प्रतीच्या शेतीशाळा झाल्या पाहिजेत. भाटे संशोधन केंद्राने विकसित केलेली लाखी बाग शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आंतरराष्ट्रीय पाैष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मिलेट नाचणी-वरी पिकाचे ‘क्लस्टर प्रोजेक्ट’ प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी ‘मिलेट मॅपिंग’ करावे. तसेच क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना कृषि व पदुम विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केली.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी विविध कृषि योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी उत्पादन वाढीबाबत सूचना केल्या. बैठकीनंतर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, संशोधन केंद्र शिरगांव, मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे भेट देवून नवीन संशोधनाबाबत माहिती घेतली.
पीएमएफएमई अंतर्गत मत्स्य प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत घेण्यात यावे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फणसाला मोठ्या प्रमाणावर प्रचंड मागणी आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये फणस मिशन अंतर्गत फणसाचे सुद्धा क्लस्टर प्रोजेक्ट तयार करण्याची सूचना केली. यावेळी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा ‘आत्मा’प्रकल्प संचालक आत्मा जालिंदर पांगरे, कृषि उपसंचालक तथा ‘स्मार्ट’चे नोडल अधिकारी अजय शेंडे,उपविभागीय कृषि अधिकारी नानाजी भोये, कृषि पर्यवेक्षक बापुराव शेंडगे उपस्थित होते.