नाणार बचाव समितीच्या पत्रकार परिषदेत ‘राडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:14 AM2018-04-26T00:14:12+5:302018-04-26T00:14:12+5:30
मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोेधात सुरू असलेले आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रकल्पाला विरोध केला असताना, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी नाणार प्रकल्प बचाव समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, प्रकल्पविरोधी संघटना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समर्थन देणाऱ्या समितीच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालत ती उधळून लावली.
याआधी प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात सेंगर म्हणाले की, २१ ते २३ एप्रिलदरम्यान आपण नाणारचा दौरा केला. त्यात स्थानिकांमध्ये फक्त १५ टक्के लोकांचा प्रकल्पाला विरोध असल्याचे दिसले. ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा प्रकल्प येथे आणला आणि त्यास सर्व मंजुरी मिळवून दिल्या, तेच पक्ष प्रमुखांच्या आदेशानंतर प्रकल्पाला विरोध करू लागले आहेत. मुळात या प्रकल्पामुळे भकास कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. मात्र हाच प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यासाठी आता राजकीय विरोध होत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेविरोधात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या घरासमोर निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकल्पाच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद होत असल्याचे समजताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि नाणार प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी पत्रकार संघात धडकले. पत्रकारांसह प्रकल्पग्रस्तांनी सेंगर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सेंगर स्वत: प्रकल्पग्रस्त नसून त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या भावनाही माहिती नाहीत. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा किंवा नाणारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याच्या घोषणा आंदोलनकर्त्यांमधून दिल्या जात होत्या. या वेळी आझाद मैदानात पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पत्रकार परिषद पुन्हा सुरळीत सुरू केली.
‘हे’ तर सरकार,
कंपनीचे दलाल!
अवघ्या तीन दिवसांपूर्वी स्थापन झालेली ही समिती सरकार व कंपनीची दलाल असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या १० महिन्यांपासून प्रकल्पग्रस्त तीव्र विरोध करत असताना सेंगर कुठे होते? मुळात शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन भडकावण्यासाठी असे प्रकार सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.