नाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 03:17 PM2018-09-27T15:17:23+5:302018-09-27T15:21:06+5:30
नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.
राजापूर : नाणार प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असतानादेखील त्याला न जुमानता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला शिवसेनेचा जोरदार विरोध असून खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.
नाणार प्रकल्पाला परिसरातील जनतेचा शंभर टक्के विरोध असतानाच शासनाने मात्र तो प्रकल्प रेटण्याची भूमिका कायम ठेवली आहे मागील दोन वर्षात अनेक आंदोलने उभारुन स्थानिक जनतेने आपला विरोध सातत्याने दाखवुन दिला आहे पण शासन मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे.
रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध असतानासुध्दा आता विद्यमान राज्य शासनाने रिफायनरीच्या समस्यांचा विचार करण्यासाठी माजी अधिकारी एम. डी. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. शिवसेनेनेचा त्या समितीला प्रखर विरोध असुन त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.
शिवसेनेने सुरवातीपासूनच रिफायनरीला जोरदार विरोध केला आहे. स्थानिक जनतेच्या आम्ही ठामपणे पाठीशी असुन जोवर शासन हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेत नाही, तोवर शिवसेनेचा लढा कायम राहिल असे त्यान्नी पुढे सांगितले नियोजीत रिफायनरी प्रकल्पाला तर मोठा विरोध आहे.
त्या विरोधाची पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली होती तर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प परिसराचा दौरा करावा व तेथील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहनदेखील यापुर्वी खासदार विनायक राऊत यांनी केले होते.
मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने कुणालाच न जुमानता रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण अवलंबले असून अशी समिती नियुक्त करणे हा प्रकल्पग्रस्त जनतेचा घोर अपमान आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.
शिवसेनेच्या खासदार, आमदारांना प्रकल्प परिसरात फिरु देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचादेखील आमदार साळवी यांनी चांगलाच समाचार घेतला.
मागील अनेक वर्षे सागवे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथील जनता यापुढेदेखील शिवसेनेबरोबर राहिल. त्यामुळे आमच्या बालेकिल्ल्यात जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल तर आम्हीदेखील तयार आहोत. या विभागात आम्ही केव्हाही फिरायला तयार असून आम्हाला अडवुन दाखवा व पुढे घडणाऱ्या परिणामांना तोंड द्यायला तयार रहा, अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे राजापुर तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, माजी सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेना तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.