नागली मूल्यवर्धित प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:31 AM2021-03-17T04:31:36+5:302021-03-17T04:31:36+5:30
कोरोनाबाबत जनजागृती सावर्डे : येथील ग्रामपंचायतीतर्फे सावर्डे व परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात ...
कोरोनाबाबत जनजागृती
सावर्डे : येथील ग्रामपंचायतीतर्फे सावर्डे व परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच समीक्षा बागवे, सहकारी सदस्यांच्या माध्यमातून काम करीत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
शिकाऱ्यांचा बंदोबस्त करा
लांजा : सध्या आंबा, काजू पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. अन्नाच्या शोधार्थ रानटी प्राणी लोकवस्तीत शिरत असतात. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शिकारी रात्री-अपरात्री फिरत असतात. या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी प्रतीक्षाच
गणपतीपुळे : सागरी महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती गतवर्षी करण्यात आली होती. लॉकडाऊनपूर्वी बसणी ते ढोकमळेपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्ता खड्डेमय झाला असून, पावसाळ्याला दोन महिने शिल्लक आहे. तत्पूर्वी रस्तादुरुस्तीची मागणी होत आहे.
शिमगोत्सवाची तयारी
रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवार (दि. १८)पासून फागपंचमी असल्याने शिमगोत्सवास प्रारंभ होणार आहे. कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी करण्यात आले आहेत. काही भाविकांनी रविवारी सुट्टी असल्याने होळी तोडून आधीच आणून ठेवली आहे.
कलिंगडे मुबलक
रत्नागिरी : सध्या बाजारात कलिंगडे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील तसेच महामार्गावर ठिकठिकाणी विक्रेत्यांनी कलिंगडांचे ढीग विक्रीसाठी लावले आहेत. २० ते २५ रुपये किलो दराने कलिंगडांची विक्री सुरू आहे. उष्मा वाढल्याने कलिंगडांना चांगली मागणी होत आहे.
माठाची खरेदी
लांजा : गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना सध्या वाढती मागणी आहे. काळ्या व लाल मातीचे माठ विक्रीसाठी आले असून, ते विविध आकारांत उपलब्ध आहेत. नळ असलेले, नसलेले माठ उपलब्ध असून, नळ असलेल्या माठांना विशेष मागणी होत आहे.
माकडांचा उपद्रव
टेंभ्ये : हरचेरी, चांदेराई परिसरात माकडांच्या उपद्रवामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आंबा, काजूसह बागायती, फळभाज्या पिकांची माकडे नासाडी करीत आहेत. माडावरील नारळ खाऊन फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शीतपेयांचा खप
राजापूर : सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. मात्र, उष्माही प्रचंड वाढला आहे. उकाडा असह्य होत असल्यानेच थंडगार पाणी, शीतपेये प्राशन केली जात आहे. विविध फळांचे रस तसेच उसाच्या रसविक्रेत्यांनी मुख्य मार्गावर दुकाने थाटली असून प्रवासी वाहने थांबवून शीतपेये प्राशन करीत आहेत.
वार्षिक परीक्षेची तयारी
रत्नागिरी : पाचवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू आहेत. प्राथमिक शाळांचे वर्ग मात्र ऑनलाईन सुरू आहेत. मात्र, सर्वच वर्गांच्या वार्षिक परीक्षा होणार असल्याने शाळा स्तरावर नियोजन सुरू आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून, वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत.