नामफलकावरील सरपंचाचेच नाव गायब
By admin | Published: January 16, 2016 11:41 PM2016-01-16T23:41:12+5:302016-01-16T23:41:12+5:30
लांजा तालुक्यातील प्रकार : नावावर पांढरा रंग मारल्याने ग्रामस्थांमधून नाराजी
लांजा : गोविळ व हसोळ या दोन गावांना जोडण्यासाठी गोविळ धोंडकोंड येथे बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या भूमिपूजन पाटीवरील गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावावर पांढरा कलर मारुन नावे पुसण्याच्या खोडसाळपणा कुणी केला असावा, या विषयाची चर्चा संपूर्ण गावात सुरु झाली असून, या प्रकाराबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
‘नाबार्ड’ योजनेंतर्गत १ कोटी १० हजार रुपये खर्च करुन गोविळ व हसोळ या दोन गावांना जोडण्यासाठी गोविळ धोंडकोंड येथे मोठा पूल उभारण्यात येत आहे. या कामाला प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय स्तरावरुन या पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी निश्चित करण्यात आला.
यावेळी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देखील सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे वगळण्यात आली होती.
ज्या गावात शासकीय कार्यक्रम होत असतो. त्या गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे असणे आवश्यक असते. मात्र, त्यावेळी देखील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी भूमिपूजनाची पाटी तयार करुन आणण्यात आली. त्यामध्ये गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे टाकण्यात आली होती. मात्र, त्या नावांवर पांढरा कलर मारुन ही नावे पुसण्यात आल्याची बाब येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम शासकीय आहे की शिवसेना संघटनेचा आहे, असा सवाल करत याबाबत नाराजी व्यक्त केली.
या भूमिपूजन समारंभाच्या पाटीवर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, प्रभारी सभापती आदेश आंबोळकर, जिल्हा परिषद सदस्य दत्ता कदम, पंचायत समिती सदस्या दीपाली दळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी, विभागप्रमुख शरद चरकरी, उपतालुकाप्रमुख दिलीप पळसुलेदेसाई, उपविभागप्रमुख सुभाष तावडे आदी मान्यवरांची नावे ठेवून सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावावर पांढरा कलर मारुन ही नावे खोडण्यात आली आहेत. भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे संबंधित ठेकेदार आयोजन करत असून, याचे नियोजन अधिकारी वर्गाकडून केले जात आहे.
मात्र, गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावांवर कलर मारुन ही नावे खोडण्याचा हा खोडसाळपणा नेमका कुणाच्या आदेशाने केला गेला आहे, याविषयी चौकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा या कृ त्याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका व पाटीवरुन अशाप्रकारे नावे खोडण्याचा प्रकार हा खेदजनक असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)