नामफलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:31 AM2021-03-31T04:31:53+5:302021-03-31T04:31:53+5:30
खेड : तालुक्यातील बिजघर येथे श्री सांप्रदाय सेवा समिती खेड सेवा केंद्राच्या बिजघर-तिसंगी सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच समारंभपूर्वक ...
खेड : तालुक्यातील बिजघर येथे श्री सांप्रदाय सेवा समिती खेड सेवा केंद्राच्या बिजघर-तिसंगी सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच समारंभपूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी सभापती विजय कदम, पंचायत समिती सदस्य राजू कदम, पोलीस पाटील संतोष मोहिते आदी उपस्थित होते.
मोबाइल टाॅवर बंद
राजापूर : तालुक्यातील भू येथील बीएसएनएलची सेवा ठप्प असून, मोबाइल टाॅवर गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद असल्याने, ग्राहकांची गैरसोय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रस्ता दुरुस्ती सुरू
देवरूख : साखरपा परिसरातील अंतर्गत व मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. शासनाकडून आलेला सर्व निधी दुरुस्तीवर खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी धडक मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.
कोराना लसीकरण
चिपळूण : शहरातील अपरांत हाॅस्पिटल येथे दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ.यतीन जाधव यांनी केले आहे. शासनाच्या सूचनेनुसार ४५ ते ५९ वयोगटांसाठी कोणत्याही आजाराची लक्षणे असणाऱ्या सर्टिफिकेटची गरज भासणार नाही.
पेपर तपासणीवर बहिष्कार
रत्नागिरी : जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. या निर्णयाचे निवेदन कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव पटवे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यावेळी अभिजीत सुर्वे, सुकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
विजेचा खांब धोकादायक
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली मानवाडी ते खडपेवाडी या वाड्यांना जोडणारी डिगोली या पाऊल वाटेवरील आठ ते दहा खांब गंजले असून, धोकादायक बनले आहे. जमिनीपासून काही अंतरावरच खांब गंजून भोके पडली आहे. तातडीने खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.