नाना कलांनी प्रेक्षक भारावले
By admin | Published: February 22, 2015 10:57 PM2015-02-22T22:57:36+5:302015-02-23T00:24:57+5:30
विविध कलागुण: ढालकर यांनी रंगवला जादूमयी कार्यक्रम
गुहागर : गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानच्यावतीने आयोजित रंगतरंग या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात हास्यसम्राट श्रीकांत ढालकर यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. तोंड न उघडता गायन केले व फणीच्या सहाय्याने विविध आवाज काढून गाणी सादर केली, अशा अनेक कला सादर करून त्यांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.कार्यक़्रमाच्या सुरुवातीला देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उपाध्यक्ष प्रकाश भावे, सचिव सुहास आठवले, खजिनदार अनिकेत गोळे यांनी श्रीकांत ढालकर व सहकाऱ्यांचा सत्कार केला. गणपतीचे गाणे गात गात काही मिनिटात ढालकर यांनी गणेशाचे चित्र रेखाटले. दयाळ पक्षी बुलबुल, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, सुबग, कहुवा गोपी आदी विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत या पक्ष्यांच्या सवयींबद्दल माहिती दिली.
फणीचा वापर करुन विशेष धून निर्माण करुन हात नका लावू माझ्या साडीला असे सू काढले. तुतारीचा आवाज, चादणं घाली रात अशी एकापेक्षा एक गाणी सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महिला व पुरुषांचा आवाज गाणी म्हटली एवढ्यावरच न थांबता चक्क हसता हसता गाणी सादर केली. शेवटच्या दहा मिनिटांत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती साकारली. यावेळी ओंकार बडवे याने उठ पंढरीचा राजा, दत्त माझा मी दत्ताचा, गाणी सादर केली. आॅरगन राजेश मोरे व ढोलकी राहुल बडवे यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)