nanar refinery project: भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची उभारणी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:16 PM2022-03-29T18:16:35+5:302022-03-29T18:19:03+5:30
राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
राजापूर : कोकणामध्ये मोठा प्रकल्प यावा असा आपला मानस आहे. त्याची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे दिली. मात्र, रिफायनरी नाणार येथे हाेणार नाही हे स्पष्ट करत रत्नागिरी जिल्ह्यात अन्य काेठेही प्रकल्प उभारताना स्थानिकांचे मत जाणून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे जात असताना राजापूरवासीयांसह रिफायनरी समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली.
यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी सागर पाटील, रिफायनरी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर, पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला उपस्थित होत्या.
धोपेश्वर, बारसू, सोलगाव परिसरातील रिफायनरी समर्थक मोठ्या प्रमाणावर राजापूर विश्रामधाम येथे उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रकल्प समर्थनाच्या फलकांसह बुलंद घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकऱ्या, महिलांना रोजगार मिळण्याला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. या संदर्भात स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याची सूचना संबंधित कंपनीला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. साऱ्यांना विश्वासात घेऊन, चर्चा करून प्रकल्प उभारणीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ठाकरे म्हणाले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी साधला नाणारवासीयांशी संवाद; विश्वास संपादित करून प्रकल्प आणण्याचे दिले आश्वासन.#adityathackeraypic.twitter.com/NNl7Fj1eUQ
— Lokmat (@lokmat) March 29, 2022