Nanar Refinery Protest: लोक आंदोलन करतायत हे चुकीचं, गाडीखाली झोपणं हे योग्य नाही; दीपक केसरकर यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:18 PM2023-04-25T13:18:38+5:302023-04-25T13:18:52+5:30
Nanar Refinery Protest: बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत.
रिफायनरीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आसपासचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बारसूच्या माळरानावर गोळा झाल्याने या भागात तणावाची स्थिती आहे. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आंदोलनातील काही महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशा भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. याचदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे. रिफायनरी विषयी अगोदरच्या सरकारने लोकांपर्यंत माहिती पोहोचवण गरजेचं होतं. आता आम्ही योग्य माहिती पोहोचवत असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
लोक आंदोलन करतायत हे चुकीचं आहे. हा आंदोलनाचा मार्ग नाही. गाडीखाली झोपणं हे योग्य नाही. हा पूर्ण ग्रीनरी प्रकल्प आहे त्यामुळे सर्वांना फायदा होईल. आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेतोय. माझ्या खात्याच्या अंडर हा प्रकल्प येत नाही त्यामुळे मी जास्त बोलणं योग्य नाही. मात्र समृद्धीला देखील कोण विरोध करत होत सर्वांना माहिती आहे त्याचे फायदे आता दिसत आहेत, असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलं.
पोलीस व्हॅनला अपघात; १६ पोलिस जखमी
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांचे वाहन अवघड वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला उलटून १६ पोलिस अंमलदार किरकोळ जखमी झाले. आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथील उतारावर सकाळी ही दुर्घटना घडली.
अटक केलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी
रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावत असल्याच्या कारणावरून रत्नागिरी पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली असून न्यायालयाकडून त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.