नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन; जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

By मनोज मुळ्ये | Published: August 9, 2024 07:29 PM2024-08-09T19:29:59+5:302024-08-09T19:30:37+5:30

पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Nanar, Sagway Bauxite Mining; Public hearing adjourned indefinitely | नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन; जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन; जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

रत्नागिरी : गणेशोत्सव तोंडावर असल्याने नाणार आणि सागवे या दोन्ही बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाणार, सागवे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर केला. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच अहवाल देतील, असेही ते म्हणाले.

आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाणार, सागवे, बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. नाणा येथे २९ ऑगस्टला, तर सागवे येथे ५ सप्टेंबरला बॉक्साइट उत्खननाबाबत जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू आहे. त्याच्या थोडाच काळ आधी ही जनसुनावणी का लावण्यात आली आहे, असा प्रश्न या ग्रामस्थांनी केला. सणासुदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना ही जनसुनावणी प्रस्तावित केली होती. आता याबाबत प्रांताधिकारी यांना अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सण तसेच पश्चिम घाट हरित क्षेत्र या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अहवाल तयार केला जाईल. ते आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य व केंद्र सरकारला अहवाल देतील, असे मंत्री सामंत म्हणाले.

बॉक्साईटचा निर्णयही ‘त्यां’चाच

ज्यांनी रिफायनरीसाठी बारसूची जागा सुचवली, त्यांनीच बॉक्साईट उत्खननाबाबतचा निर्णय घेतला होता. २०१८ सालीच हा निर्णय झाला आहे, असे मंत्री सामंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.

Web Title: Nanar, Sagway Bauxite Mining; Public hearing adjourned indefinitely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.