निघावयाला नानिवडेकर हरकत ‘आहे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:19 AM2021-07-12T04:19:59+5:302021-07-12T04:19:59+5:30
मधुसूदन नानिवडेकर! कोकणातलं साधंसुधं जगणं असणाऱ्या माणसाचं नाव जितकं साधंसुधं असावं, तितकं साधंसुधं जगणं आणि वागणं होतं नानिवडेकरांचं! साधासा ...
मधुसूदन नानिवडेकर! कोकणातलं साधंसुधं जगणं असणाऱ्या माणसाचं नाव जितकं साधंसुधं असावं, तितकं साधंसुधं जगणं आणि वागणं होतं नानिवडेकरांचं! साधासा शर्ट-पॅन्ट घालून, साधं वागणारा हा माणूस बोलताबोलता माणसाच्या मनाची पकड घ्यायचा. लोक भपका करून प्रभावित करतात, नानिवडेकर आपल्या साधेपणानं लोकांना भारावून सोडायचे. इतका प्रतिभासंपन्न माणूस आपल्या मित्रवलयात असल्याने खूप कौतुक वाटायचं आणि वेळोवेळी ते त्यांच्यासमोर मांडलंही जायचं. तेव्हा मात्र अंगभूत प्रामाणिकपणाने अगदी जवळच्या लोकांजवळ नानिवडेकर बोलायचे, ‘प्रतिभा, प्रसिद्धी सगळं ठीक आहे, पण याचं भाकरीत रूपांतर होत नाही’. विलक्षण प्रतिभेनं अस्मानाला गवसणी घालणाऱ्या कवींच्या अंतर्मनाची ती ठसठस अगदी क्वचितच बाहेर यायची. एरवी नानिवडेकर आपल्या हळव्या अलवार जगात चंद्रताऱ्यांना गवसणी घालण्यात आणि स्त्री मनाचा वेध घेण्यात मश्गुल असायचे.
त्यांच्याशी ओळख झाल्यावर जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे या माणसामध्ये प्रचंड आंतरिक ओलावा आहे. हा माणूस मनाचा अतिशय हळवा आहे. आजूबाजूचं अफाट जग हळवेपणानं टिपताना माणसांच्या मनाचा वेध घेणारं त्यांचं मन देवाने कशाचं बनवलं होतं कुणास ठाऊक! बाईच्या कविता, गझल गाताना हे अलवार हळवेपण मनमुराद उफाळून यायचं. बाईचं मन बाईपेक्षाही नेटकेपणाने नानिवडेकरांना उमगलं होतं, असं मला नेहमी वाटायचं आणि त्यांच्या गझल ऐकताना, वाचताना ते जाणवायचंसुद्धा!
नानिवडेकरांची गझल ऐकताना या माणसाला हृदयातून किती हळवे पाझर फुटत असावेत, असा प्रश्न मला नेहमी पडतो. इतकी हळवी माणसं देव अभावाने बनवतो. मग त्यांना नेण्याची का घाई करतो? एका मित्राने म्हटलंय अगदी तसंच म्हणावसं वाटतंय, निघावयाला नानिवडेकर हरकत ‘आहे’!
-ज्योती मुळ्ये, रत्नागिरी